रतन टाटा यांचे सावत्र बंधू नवल ठरले समुहाचे वारस

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टची धुरा रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

#मुंबई :उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टची धुरा रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मुंबईत टाटा समुहाची एक महत्त्वाची बैठक होऊन टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकारी व विश्वस्तांच्या सहमतीने रतन टाटांचे भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टाटा समुहाच्या दोन सर्वात मोठ्या धर्मादाय संस्था सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या प्रमुखपदी आता नोएल टाटांची नियुक्ती झाली आहे. नोएल टाटा हे याआधी या दोन्ही संस्थांचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते. आता ते या संस्थांचा कारभारही पाहतील. आधी रतन टाटा हे काम पाहत होते. स्वतः रतन टाटा यांनी या संस्था उभारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. टाटा समुहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची मोठी भागिदारी आहे. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सची तब्बल ६६ टक्के भागिदारी आहे. टाटा समूह टाटा ट्रस्टद्वारे चालवला जातो. टाटा ट्रस्ट धर्मादाय उपक्रम आणि प्रशासनावर देखरेख ठेवण्याचं काम पाहतो.

रतन टाटांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटांचं नाव सर्वात पुढे होतं. रतन टाटांचे वडील नवल टाटा यांनी दोन लग्नं केली होती. नवल टाटांचे पहिलं लग्न सूनी यांच्याशी झालं होतं. सूनी व नवल दाम्पत्याला दोन मुलं होती. रतन व जिमी अशी त्यांची नावं आहेत. या दोघांनी लग्नं केली नाहीत. नवल यांनी १९५५ मध्ये स्वित्झर्लंडमधील उद्योजिका सिमोन यांच्याशी दुसरं लग्न केलं. या जोडप्याने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा म्हणजे नोएल टाटा.

कोण आहेत नोएल टाटा?

नोएल टाटा हे सध्या सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. तसेच ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते टायटन लिमिटेड कंपनीचे उपाध्यक्षही आहेत. याआधी सलग ११ वर्षे ते ट्रेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते. ते ट्रेंटचे उपाध्यक्ष असताना ट्रेंटचं केवळ एक स्टोर होतं. त्यानंतर त्यांनी ट्रेंटची ७०० स्टोर उभी केली. ते नेरोलॅक पेंट्स व स्मिथ्सच्या संचालक मंडळावरही आहेत. नोएल टाटा यांनी ससेक्स विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण धेतलं आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story