नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस यांच्या आघाडीने बहुमताचा आकडा पार केला असून ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री होतील, हे आता स्पष्ट झाले आहे. ओमर अब्दुल्ला यांचे वडील व जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीच ही माहिती दिली आहे.
फारुख अब्दुल्ला यांनी माध्यमांशी बोलताना आगामी सरकार स्थापनेबाबत भूमिका स्पष्ट केली. दहा वर्षांनंतर लोकांनी आम्हाला बहुमताचा कौल दिला आहे. आमची अल्लाहकडे प्रार्थना आहे की, आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकू. जम्मू-काश्मीरमध्ये आमचे सरकार म्हणजे पोलीसराज नसून लोकांचे राज्य असेल.
आम्ही तुरुंगात असणाऱ्या निर्दोष लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. माध्यमांना स्वातंत्र्य असेल. हिंदू व मुस्लिमांमध्ये आपल्याला विश्वास निर्माण करावा लागेल. मला आशा आहे की, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देण्यासाठी इंडिया आघाडीतील मित्रपक्ष आमच्यासोबत उभे राहतील, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले.
आम आदमी पक्षाचा चंचुप्रवेश
'आप'ने जम्मू-काश्मीर विधानसभेची एक जागा जिंकत या राज्याच्या राजकारणात शिरकाव केला आहे. आम आदमी पक्षाने डोडा विधानसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे. इथून 'आप'चे उमेदवार मेहराज मलिक यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर भाजपचे गजयसिंह राणा यांच्यासह काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवारांचे आव्हान होते. ते आव्हान परतावून लावत मलिक यांनी बाजी मारली. त्यांच्या रूपाने आम आदमी पक्षाला जम्मू-काश्मीरमध्ये पहिला आमदार मिळाला आहे.
जागा वाढल्या पण विश्वासार्हतेचे काय?
जम्मू-काश्मीरमध्ये यंदाच्या निवडणुकीत अनुच्छेद ३७० आणि त्यानंतर राज्याचा दर्जा मिळवण्यातील राजकीय वाद या बाबी विशेष चर्चेत राहिल्या. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून या संदर्भात मुद्दे मांडले जात होते. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेपर्यंतची वाटचाल करण्यात अपयश आले. असे असले तरी २०१४ पेक्षा यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढल्या असून हा पक्षाचा नैतिक विजयच मानला जात आहे.