लेख: भारताचे 'अनमोल' रतन

ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय उद्योगजगताला एका नव्या सुवर्णकाळात नेणाऱ्या उद्योजक रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 11 Oct 2024
  • 01:19 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय उद्योगजगताला एका नव्या सुवर्णकाळात नेणाऱ्या उद्योजक रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या या उद्योगपतीने आयुष्यभर सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा ध्यास घेतला होता. व्यावसायिक नीतिमत्ता, धडाडी आणि मानवतावाद जोपासणाऱ्या या महान उद्योगमहर्षीच्या आयुष्यातील हे काही प्रसंग.       

ज्या कंपनीचे मालक वडील, त्याच कंपनीत कर्मचारी म्हणून राबले
रतन टाटांच्या निधनानंतर त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रतन टाटा हे जेआरडी टाटा यांच्या बरोबर दिसत आहेत. जेआरडी एका कारमध्ये सुटाबुटात दिसत आहेत, तर रतन टाटा त्यांच्या समोर एका सामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे बसले आहेत. ज्यावेळी त्यांनी टाटा समूहात नोकरीला सुरुवात केली त्यावेळचा हा फोटो असावा असे सांगितले जात आहे. या फोटोवरून रतन टाटा यांचा साधेपणा आणि काही तरी शिकण्याची भूख दिसून येते. ते आपल्याच कर्मचाऱ्यांबरोबर सहज मिसळत होते.

जर कोणाचे आजोबा किंवा वडील करोडो रुपयांच्या उद्योगांचे मालक असतील, तर तो मुलगा त्याच कंपनीत सामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे नोकरी करेल का, असा प्रश्न जर कोणाला विचारला तर त्याचे आपोआप उत्तर असेल नाही. पण रतन टाटांबाबत थोडे वेगळे घडले होते.  १९६२ साली रतन टाटा हे परदेशातील एक मोठ्या पगाराची नोकरी सोडून भारतात परत आले होते. त्यावेळी त्यांच्या समोर त्यांच्या वडिलांच्या उद्योगात एका मोठ्या पदावर बसून कारभार सांभाळण्याचा पर्याय होता, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी उद्योगातील बारकावे समजावून घेण्यासाठी त्यांनी आपल्याच कंपनीत एक कर्मचारी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता.  

ज्या कंपनीचे मालक टाटा कुटुंबातील सदस्य होते, त्याच कटुंबातील रतन टाटा हे एक वेळ होती की ते चुना आणि दगड भट्टीत टाकण्याचे काम करत होते. हे काम करत असतानाच ते व्यवसायातील बारकावे शिकत गेले. पुढे १९९१ मध्ये त्यांनी टाटा कंपनीची सूत्रे आपल्या हातात घेतली. रतन टाटा यांना सुरुवातीच्या काळात आयबीएमसारख्या कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र जेआरडी टाटा यांना ते पटले नाही. त्यांनी रतन टाटा यांना फोन लावला. त्यांच्याकडून त्यांचा बायोडेटा मागवला. पण त्या काळात रतन टाटा यांच्याकडे बायोडेटा नव्हता. त्यानंतर काही तरी करून तो तयार केला आणि जेआरडी यांना पाठवला.

जेआरडी टाटा यांचा ज्यावेळी फोन आला होता, त्यावेळी रतन टाटा हे आयबीएमच्या ऑफिसमध्येच होते. त्या वेळी ते म्हणाले होते की तू भारतात राहून इतर कंपनीत कसे काय काम करू शकतो. त्यानंतर जेआरडी यांनीच रतन टाटा यांना टाटा समूहात नोकरी दिली. ती त्यांची पहिली नोकरी होती. रतन टाटा एक कर्मचारी म्हणून टाटा समूहात जवळपास सहा वर्षे काम करत होते. ते जमशेदपूरच्या फॅक्टरीमध्येही राहिले आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात शॉपफ्लोर मजुराप्रमाणे कामही केले आहे. त्यावेळी मजुरांसाठी असलेला निळा ड्रेस त्यांना घालावा लागत होता.  आजच्या युवकांसमोर रतन टाटा हे रोल मॉडेल आहेत. रतन टाटा जेवढे मोठे उद्योजक होते तेवढेच मोठे त्यांचे मनही होते. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या गरजवंताच्या मदतीसाठी तयार असायचे. या मागचे सर्वात मोठे जर कोणते कारण असेल तर ते होते त्यांची समाजाशी असलेली बांधीलकी. आज ते जरी आपल्यातून निघून गेले असतील तरी ते युवकांसाठी प्रेरणादायी असेच आहेत हे मात्र नक्की. 

अपमानाचा असा घेतला बदला; बिल फोर्डना मानावे लागले टाटांचे आभार
जवळपास १६ वर्षांपूर्वी रतन टाटांनी टाटा समूहासाठी एक मोठा करार यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. फोर्डच्या मालकीचे जॅग्वार आणि लँड रोव्हर हे दोन बलाढ्य ब्रँड टाटांनी आपल्या पंखांखाली घेतले होते. उद्योग जगतातील हा एक मोठा व्यवहार ठरला होता. त्यावेळी या व्यवहाराची बरीच चर्चाही पाहायला मिळाली होती, पण हा व्यवहार स्वत: रतन टाटांसाठी प्रचंड जिव्हाळ्याचा विषय होता. याचे कारण त्याच्या १० वर्ष आधी घडलेल्या एका घटनेमध्ये आहे. रतन टाटांना प्रचंड जिव्हारी लागलेल्या त्या घटनेमुळे २००८ साली फोर्डसोबत झालेला व्यवहार हा एकप्रकारे त्यांना झालेल्या मानसिक जखमेवरचा उपचारच होता.

वेदांत बिर्ला यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार, या सगळ्याला सुरुवात झाली ती १९९८ साली. टाटा मोटर्सने तेव्हा ‘टाटा इंडिका’ ही त्यांची पहिली पूर्णपणे भारतीय बनावटीची कार तेव्हा लाँच केली होती. हा रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. पण तेव्हा टाटा इंडिकाला बाजारात अपयशाचा सामना करावा लागला. टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट पिछाडीवर पडू लागला. बाजारात टाटा इंडिकाची घटती मागणी व त्याहून खाली जाणारी विक्री पाहता टाटांनी त्यांच्या कार व्यवसायातील पदार्पणाच्या पहिल्या वर्षभरातच हा व्यवसाय विक्री करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी १९९९ साली अमेरिकेतली कार उद्योगातील बलाढ्य कंपनी फोर्डशी संपर्क साधला. टाटा त्यांच्या टीमसमवेत फोर्डचे प्रमुख बिल फोर्ड यांना भेटायला अमेरिकेत गेले. ठरल्याप्रमाणे बैठकही सुरू झाली, पण या बैठकीत रतन टाटांचा अवमान झाला!

टाटा यांनी कार उत्पादन उद्योगात यायलाच नको होते, असे फोर्ड त्यांना सांगू लागले. बिल फोर्ड यांनी रतन टाटांना तुम्हाला या क्षेत्राची काहीही माहिती नाही, मग तुम्ही प्रवासी कार उत्पादन क्षेत्रात उतरलातच का, असा सवालही केला होता. त्यामुळे टाटांचा कार विभाग खरेदी करून फोर्ड त्यांना मदत करेल, असे बिल फोर्ड तेव्हा म्हणाले. मात्र तेव्हा टाटा व फोर्ड यांच्यात करार होऊ शकला नाही. त्या बैठकीत आलेल्या वाईट अनुभवाची चीड रतन टाटांच्या मनात होती. त्यातून त्यांनी कार उद्योगावर अधिक लक्ष केंद्रित केले. कार उत्पादन विभागाची विक्री करायची नाही, हे त्यांनी मनाशी पक्के केले. रतन टाटा अमेरिकेहून परत आल्यानंतर पुढच्या दहा वर्षांत जे घडले,  तो कार उत्पादन क्षेत्रातला एक चमत्कारच ठरला. त्यानंतर बरोबर ९ वर्षांनी, म्हणजेच २००८ सालच्या आर्थिक महामंदीच्या काळात फोर्ड कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. तेव्हा मग रतन टाटा त्यांच्या मदतीला गेले व त्यांनी फोर्डना त्यांचे जॅग्वार व लँड रोव्हर हे दोन ब्रँड खरेदी करण्याचा प्रस्ताव बिल फोर्ड यांच्यासमोर ठेवला. एवढेच नाही, रतन टाटांनी त्याच वर्षी तब्बल २.३ बिलियन डॉलर्स रक्कम रोख चुकती करून हा करार पूर्ण केल्याचेही सांगितले जाते. दहा वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती  झाली. 



फक्त यावेळी दोघांच्या जागा बदलल्या होत्या. फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड या करारानंतर रतन टाटांचे आभार मानत म्हणाले, ‘जॅग्वार व लँड रोव्हर खरेदी करून माझी मोठी मदत केली आहे.  त्यानंतर रतन टाटांनी जॅग्वार व लँड रोव्हरला बाजारपेठेतील एक सर्वाधिक फायद्यात चालणारा ब्रँड बनवला. आज टाटा समूहाच्या अर्थपुरवठ्याचा महत्त्वाचा हिस्सा या दोन ब्रँड्सकडून पुरवला जातो. 

अशी सुचली 'नॅनो'ची कल्पना
प्रत्येक कुटुंबाला वाटते आपल्याकडे कार असावी. पण ती खिशाला परवडणारी नव्हती. मग त्याला पर्याय म्हणून ते दुचाकीचा वापर करत असते. संपुर्ण कुटुंब दुचाकीवरूनच प्रवास करत अशी स्थिती होती. एक दिवस रतन टाटा प्रवास करत होते. त्यावेळी ते आपल्या गाडीत होते. त्याच वेळी त्यांना एक कुटुंब टु व्हिलरवर दिसले. पती, पत्नी आणि दोन मुले त्या छोट्या दुचाकीवर कसेबसे बसले होते. त्याच वेळी त्यांच्या मनाला चटका लागून गेला. जर या कुटुंबाकडे छोटी का होई ना कार असती तर? असा प्रश्न त्यांच्या मनात आला. त्या हे कुटुंब व्यवस्थित बसू शकले असते. त्यांना त्रासही झाला नसता. हा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. तिथून सुरू झाला स्वस्त कार बनवण्याचा रतन टाटा यांचा प्रवास.

टाटा नॅनो बाबत रतन टाटा यांनी अनेक वेळा आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या आहे. त्यांनी एकदा इंस्टाग्रामवरही एक पोस्ट लिहीली होती. त्यात ते म्हणाले होते की आर्किटेक्चर स्कूलचा असल्याने त्याचा फायदा होत होता. रिकाम्या वेळात ते डुडल काढत असता. त्याच वेळी त्यांच्या मनात एक संकल्पना आली होती. जर मोटरसायकल जास्त सुरक्षित झाली तर किती छान होईल. त्या दृष्टीने त्यांनी एका कारचे डुडल म्हणजेच स्केच तयार केले. ते बग्गी सारखे होते. त्याला दरवाजेही नव्हते. त्यानंतर त्यांनी ठरवले की देशातील सर्व सामान्यांसाठी कार बनवायची. ज्यांचे कार घेण्याचे स्वप्न आहे पण खरेदी करण्याची क्षमता नाही, अशांसाठी रतन टाटांनी जी कार बनवली ती होती टाटा नॅनो. या कारला लाखमोलाची म्हणूनही ओळखले जाऊ लागले.  त्यानंतर नॅनोचे डिजाईन बनवण्याची जबाबदारी गिरीश वाघ यांना देण्यात आली. वाघ यांनी या आधीही टाटाच्या एका ड्रिम प्रोजेक्टवर काम केले होते. शिवाय ते सफल ही झाले होते. त्यांनी छोटा ट्रक म्हणजेच छोटा हत्ती तयार केला होता. त्यानंतर नॅनोच्या कामासाठी वाघ यांची टिम जवळपास पाच वर्ष काम करत होती. त्यानंतर रतन टाटा यांनी १८ मे २००६ साली पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि वाणिज्य मंत्री  निरुपम सेन यांच्या बरोबर बैठक केली. त्यानंतर टाटा नॅनो कारचा निर्मिती कारखाना बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे सुरू केला जाईल अशी घोषणा केली. लगेचच जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली.

टाटांच्या नॅनो प्रकल्पासाठी जे जमीन अधिग्रहण केले जात होते त्याला जोरदार विरोध केला होता. त्यांनी सिंगूरला जाण्याचा हट्ट धरला होता. मात्र त्यांना सिंगूरला जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्यानंतर तृणमुल काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार हंगामा केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात ३ डिसेंबर २००६ ला आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पा विरोधात मोठे आंदोलन उभे करत ते सुरू ठेवले. या वादात हा प्रकल्प पश्चिम बंगालमधून थेट गुजरातच्या साणंदमध्ये गेला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story