राष्ट्रवादीच्या खासदारांमुळे केंद्र सरकारवर नामुष्की
#नवी दिल्ली
सुरत न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेले वायनाडचे खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्यावरून देशभर वादळ उठल्याच्या पार्श्वभूमीवर लक्षद्विपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांचे रद्द झालेले संसद सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. फैजल यांना एका गुन्हेगारी खटल्यात झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने सदस्यत्व पुन्हा बहाल केल्याचे दिसते. दरम्यान राहुल गांधी सुरत येथील कोर्टाच्या निकालाला गुरुवारी सत्र न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. अपील करण्यासाठी त्यांना ३० दिवसांची मुदत दिलेली होती.
एका खून प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना कोर्टाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांचे संसद सदस्यत्व आपोआप रद्द झाले होते. मात्र, या निकालाला केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. आपल्या शिक्षेला स्थगिती देऊन दोन महिने झाले तरी संसद
सदस्यत्व पुन्हा बहाल केले नसल्याने फैजल यांनी लोकसभा सचिवालयाच्या बेकायदा कृत्याला आव्हान दिले होते.
२००९ मध्ये माजी केंद्रीय मंत्री पी.एमसैद यांच्या नातेवाईकांच्या खून प्रकरणात आपल्याविरुद्ध चुकीचा, खोटा खटला दाखल केल्याचा दावा फेजल यांनी केला होता. हे प्रकरण सुरू असतानाच २०१९ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. जानेवारीमध्ये त्यांना आणि इतर तिघांना या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा झाली. रिकाम्या झालेल्या मतदारसंघात निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. मात्र, निवडणुकीपूर्वी दोन दिवस अगोदर केरळ उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्याने निवडणूक रद्द करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ३० जानेवारी रोजी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेऊन फैजल यांची अपात्रता रद्द करण्याची मागणी केली होती. वृत्तसंस्था