मणिपूर पुन्हा पेटले, आमदाराच्या घरास आग, १०० घरे पेटवली
#इंफाळ
महिन्यापेक्षा अधिक काळ वांशिक हिंसाचार होरपळत असलेले मणिपूर शांत होण्याची काही चिन्ह दिसत नाही. २९ मे पासून चार दिवस तळ ठोकून बसलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीस परतल्यानंतर रविवारी पुन्हा हिंसाचार उसळला. काकचिंग जिल्ह्यातील सेरो गावात काही लोकांनी १०० घरांना आग लावली. यामध्ये काँग्रेस आमदार रणजित सिंह यांच्या घराचाही समावेश आहे. राज्यात मैतेई आणि कुकी समाजामध्ये ३ मे पासून संघर्ष सुरू आहे. ताज्या घटनेत कोणत्या समाजातील लोकांनी सुरुवात केली हे कळलेले नाही.
राज्यात आतापर्यंतच्या हिंसाचारात ९८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३१० जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, ३७ हजारांहून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले असून हिंसाचारामुळे ११ हून अधिक जिल्हे प्रभावित झाले आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी काही लोक सेरो गावात आले आणि त्यांनी आमदार रणजीत यांच्या घराची तोडफोड सुरू केली. आमदार व त्यांच्या कुटुंबीयांची सुटका झाली. हिंसक जमावाने अनेक घरांना आग लावली. आग लागल्यानंतर लोकांना घरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यांना मदत छावणीत नेण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
ग्रामीण भागात तैनात असलेल्या बीएसएफच्या पथकावरही जमावाने गोळीबार केला. पोस्टवर मोर्टारने हल्ला केला. यात एकही जवान जखमी झालेला नाही. संशयितांनी बीएसएफ चौकीवर हल्ला करण्यासाठी चोरीच्या शस्त्रांचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, सुरक्षा दल आणि हिंसक जमावात गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे. राजधानी इंफाळला लागून असलेल्या सेराऊ आणि सुगनू भागात रविवारी हिंसक संघर्ष झाला.
चार दिवस इंफाळमध्ये तळ ठोकून असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील विविध जमातीच्या लोकांशी चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. पोलीस महासंचालकांना हटविण्याबरोबर न्यायालयीन चौकशीची घोषणा केली होती. तसेच लोकांना शस्त्रे सरकार दफ्तरी जमा करण्याचे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. मात्र, ते दिल्लीस परतल्यानंतर लगेचच हिंसाचाराला सुरुवात झाली आहे.