अवधेश राय खून प्रकरणी मुख्तार अन्सारीला जन्मठेप
#लखनौ
कुख्यात गुंड राजकारणी मुख्तार अन्सारी याला अवधेश राय खून प्रकरणात वाराणसीच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. घटना झाल्यानंतर ३२ वर्षांनंतर हा निकाल लागला आहे. हत्या झालेले अवधेश राय हे काँग्रेसचे माजी आमदार अजय राय यांचे बंधू होते. मुख्तार अन्सारी सध्या बांदा कारागृहात आहे. सुनावणी वेळी आभासी पद्धतीने हजर करण्यात आले. न्यायालयाने मुख्तारला कलम-३०२ अन्वये दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
३ ऑगस्ट १९९१ रोजी काँग्रेसचे माजी आमदार अजय राय यांचा भाऊ अवधेश यांची वाराणसीतील लहुराबीर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अजय राय आणि अवधेश राय घराबाहेर उभे असताना हा हल्ला झाला. कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. यात अवधेश राय ठार झाला. या प्रकरणी भाऊ अजय राय यांनी माजी आमदार अब्दुल कलाम यांच्यासह मुख्तार, भीम सिंग, कमलेश सिंह, राकेश यांच्याविरुद्ध चेतगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या खटल्यात फिर्यादी व साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. मुख्तार अन्सारी यांनी गुन्हा केला, तेव्हा ते आमदार नव्हते. खटल्याचा निकाल आला तेव्हाही ते आमदार नाहीत.
मुख्तारच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज देऊन हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे. कारागृहात आपल्यावर हल्ला होऊ शकतो, असे त्याने सांगितले. यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. मुख्तार यांनी अवधेश राय खून प्रकरणापूर्वी बराकीत काही लोकांची नोंदणीशिवाय प्रवेश केल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.