लालूप्रसादांनी दिली मोदींना प्रेरणा?

राहुल गांधींमुळे सुरू झाले होते 'चौकीदार' कॅम्पेन, आता लालूप्रसाद यादवांमुळे 'मोदी का परिवार'

LaluPrasadinspiredModi?

लालूप्रसादांनी दिली मोदींना प्रेरणा?

#नवी दिल्ली

भाजपने निवडणुकीच्या तोंडावर एक आगळीवेगळी मोहीम सुरू केली आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी आपले ट्विटर बायो बदलले असून यामध्ये त्यांनी आपल्या नावापुढे  'मोदी का परिवार' असे लिहिले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजपने या कॅम्पेनला सुरुवात केली आहे. असेच एक कॅम्पेन भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी चालवले होते, विशेष म्हणजे या कॅम्पेनला काँग्रेस खासदार राहुल गांधी कारणीभूत ठरले होते.

भाजपचे टॉपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या नावात 'मोदी का परिवार' असा बदल केला. त्यानंतर सोशल मीडियासह सर्व माध्यमांमध्ये भाजपच्या या नव्या कॅम्पेनची चर्चा सुरू झाली. पण या कॅम्पेनला कारणीभूत ठरले ते राजदचे नेते लालूप्रसाद यादव. यादव यांनी नुकतेच म्हटले होते की, मोदींना आपले स्वतःचे कुटुंब नाही.  पण आता भाजपने त्यांच्या याच विधानाचा समाचार घेत 'मोदींचा परिवार' असे राजकीय कॅम्पेनच सुरू केले आहे.

२०१४ च्या निवडणुकीत मोदींनी आपला स्वतःचा उल्लेख 'चौकीदार' असा केला होता होता.  यावेळी राफेल लढाऊ विमानांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राहुल गांधींनी मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि देशाचा 'चौकीदारच चोर' आहे, असा आरोप मोदींवर केला होता. पण यानंतर मे २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांआधीच मोदींनी हे कॅम्पन लॉन्च केले. त्यासाठी त्यांनी ट्विटरवर एक व्हीडीओ पोस्ट केला ज्याला त्यांनी #MainBhuChowkidar असा हॅशटॅग वापरला होता.

'मोदी का परिवार' ही घोषणा ट्विटरच्या बायोमध्ये भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी ठेवली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे, पियूष गोयल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, विष्णूदेव साई आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा समावेश आहे. दरम्यान, तेलंगणाच्या अदिलाबाद इथे सभेला संबोधित करताना मोदींनी लालूप्रसाद यादवांच्या विधानाचा समाचार घेताना म्हटले की, "देशाचे करोडो लोक मला त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचा भाग समजतात. देशातील १४० कोटी लोक मला त्यांच्या कुटुंबाचा भाग समजतात. ज्यांचे कोणीही नाही त्यांचा मोदी आहे आणि मोदींचे ते आहेत, असेही मोदींनी आपल्या भाषणात म्हटले. यानंतर लगेचच भाजपच्या नेत्यांनी आपले ट्विटर बायो बदलले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest