संग्रहित छायाचित्र
तिरुवनंतपूरम ; केरळमधील कासारगोड येथील अंजुतांबलम वीरकावू मंदिरात सोमवारी रात्री साडेबारा वाजता रचून ठेवलेल्या फटाक्यांना आग लागली. ही घटना इतकी मोठी होती की, यात तब्बल १५० जण जखमी आहेत तर जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. आतषबाजी दरम्यान ठिणग्या फटाक्याच्या गोदामापर्यंत पोहोचल्या नंतर मोठा स्फोट झाला.
ही घटना केरळच्या नीलेश्वरम भागात घडली. या भागातील वीरारकवू मंदिर महोत्सवात आतषबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फटाके मागवण्यात आले होते. मंदिर परिसरातच एका बाजूला हे फटाके रचून ठेवले होते. पण याच ठिकाणी आग लागून मोठी दुर्घटना घडली. सोमवारी मध्यरात्री ही आग लागली. महोत्सव असल्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. या आगीमुळे तब्बल १५० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू भागातील रुग्णालयांत उपचार चालू आहेत.
सध्या स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वार्षिक कालियाट्टम उत्सवासाठी १५०० लोक मंदिरात जमले होते. या ठिकाणी फटाके फोडले जात होते, त्यामुळे ठिणग्या फटाक्यांच्या स्टोरेज एरियापर्यंत पोहोचल्या, जिथे आगीमुळे स्फोट झाला.
या साठवणुकीच्या ठिकाणी हजारो रुपये किमतीचे फटाके ठेवण्यात आले होते. या अपघातप्रकरणी पोलिसांनी मंदिर समितीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मंदिर समितीने फटाके व फटाके फोडण्याचा परवानाही घेतला नव्हता. रात्री साडेबारा वाजेपर्यंतही मंदिरात मोठी गर्दी होती. मंदिराजवळ लोक कालियाट्टम उत्सवासाठी फटाके फोडत होते. फटाके फोडत असताना हा स्फोट झाला.
स्फोटाचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत दूर ऐकू आला. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. पाठीमागे उभे असलेले लोक जखमींच्या मदतीसाठी धावले. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. पाठीमागे उभे असलेले लोक जखमींच्या मदतीसाठी धावले. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.