संग्रहित छायाचित्र
गाझियाबाद: डेटिंग ॲपच्या माध्यमातून मैत्रीच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद शहरात पाहायला मिळाला. आता असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडला आहे. डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आल्याच्या घटनेचा पर्दाफाश करण्यात आला आहे. डेटिंग ॲपच्या माध्यमातून मैत्रीच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी तीन तरुण आणि पाच मुलींना अटक केली आहे.
ही टोळी तरुणांना त्यांच्या कॅफेमध्ये बोलावून पैसे उकळत असायची अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौशांबी परिसरातील एका बनावट कॅफेमधून ही टोळी आपले रॅकेट चालवत होती. या रॅकेटमध्ये काम करणाऱ्या मुली मुलांना डेटच्या नावाने फसवून या कॅफेमधून आणत. आल्यानंतर कॅफेमध्ये महागडे पदार्थ मागवले जात. आणि बिल द्यायच्या वेळेस या पदार्थांच्या किमती अव्वाच्या सव्वा लावल्या जात. एवढेच नाही तर बिल दिले नाही तर तरुणांना ओलीस ठेवले जात असे. मुलांकडून जबरदस्तीने पैसे घेतले जायचे.
कोल्ड्रिंक्सचे झाले १६ हजार बिल
एका तरुणाला फसवून २१ ऑक्टोबर रोजी या कॅफेमध्ये बोलाविले. दोघे कॅफेत भेटल्यानंतर मुलीने ऑर्डर दिली. कोल्ड्रिंक्सचे १६ हजार ४०० रुपये रुपये बिल पाहून तरुणाला धक्का बसला. कोल्ड्रिंक्सचे एवढे बिल आल्यामुळे संबंधित तरुणाने विरोध केला. मात्र कॅफेच्या संचालकाने त्याला कॅफेतून बाहेर पडण्यापासून बंदी केली. त्याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. यानंतर संबंधित तरुणाने त्याचे लाइव्ह लोकेशन मित्राला शेअर केले. घडलेल्या घटनेची माहिती मेसेजद्वारे दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आढळून आला. यातील चार महिला दिल्लीतील असून त्यांनी विविध डेटिंग ॲप्सवर प्रोफाइल ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. या माध्यमातून त्या पुरुषांना आकर्षित करत त्यांची फसवणूक करत असत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी आणखी एका प्रकरणाबाबत सांगितले २२ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या दयालपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने या प्रकरणासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली होती. यानंतर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात आली.
कॅफे मालकाने दिली कबुली
यामध्ये चौकशीत अटक केलेल्या कॅफे मालकाने कबुली दिली आहे की, आम्ही कॅफेमध्ये काम करणाऱ्या मुलींना डेटिंग ॲप्सवर मुलांशी बोलायला सांगायचो. त्यानंतर मुली त्यांना त्यांच्या कॅफेमध्ये भेटायला बोलावत. मुलांना घेऊन आल्यानंतर कॅफेमध्ये त्यांनी ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या किमतीच्या ५ ते ६ पट वाढ करून बिल द्यायचे आणि बिल देण्यास नकार दिल्यास ते त्यांना ओलीस ठेवत पैशांची मागणी करायचे.