जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या रुग्णवाहिकेवर गोळीबार
जम्मू : जम्मू क्षेत्रात मागील पंधरा दिवसांपासून दहशतवादी सामान्य लोकांना लक्ष्य करीत आहेत. सोमवार दि. २८ रोजी दहशतवाद्यांनी अखनूरमध्ये लष्कराच्या रुग्णवाहिकेवर आसन मंदिराजवळ गोळीबार केला. दहशतवाद्यांकडे रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (आरपीजी) असून ते डागले जात आहेत. म्हणून सैन्याने तीन बीएमपी-२ रणगाडे मैदानात उतरवले.
हा हल्ला तीन दहशतवाद्यांनी केल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले आहे. या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही वेळातच लष्कराने दहशतवाद्यांना घेरले आणि एकाचा खात्मा केला. अन्य दोघांचा एनएसजी कमांडोज शोध घेत आहेत.
२४ ऑक्टोबरच्या बारामुल्लातील लष्करी तुकडीवरील हल्ल्यातही दहशतवाद्यांनी आरपीजी वापरले होते. त्यात ३ जवान शहीद झाले होते. १६ नंतरचा हा ५ वा हल्ला आहे.
लष्कराने पहिल्यांदाच एलआेसीजवळ चार बीएमपी-२ ‘सरथ’ रणगाडे उतरवले. यात ३३ मिमी स्वयंचलित तोफ, ७.६२ मिमीची मशिन गन, ४ किमी रेंजची कोंकर्स मिसाइल, नाईट व्हिजन उपकरण आहेत. हा रणगाडा ९ जवानांना घेऊन ताशी ६५ किमी वेगाने जातो. दरम्यान, एक महिन्यात काश्मीरमध्ये ९ अतिरेक्यांचा खात्मा झाला. पर्यटक निर्भय होऊन भेट देत आहेत. सप्टेंबरमध्ये १.९७ लाख पर्यटक काश्मीरला आले होते.