बियरच्या बाटलीत आढळली मेलेली पाल
हैद्राबाद : जर तुम्ही बियरचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तेलंगणातील विकाराबादमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बडवायझर बिअरच्या बॉटलमध्ये चक्क पाल आढळली आहे. या घटनेचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे बियर पिणे सुरक्षित आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या मानकांवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरेली गावातील लक्ष्मीकांत रेड्डी आणि अनंतय्या या दोघांनी धारूर येथील एका वाईन शॉपमधून सुमारे चार हजार रुपयांची दारू खरेदी केली होती. यातील बडवायझर कंपनीच्या बिअरची बाटली उघडली तेव्हा त्यात त्यांना पाल तरंगत असताना दिसल्याने त्यांना मोठा धक्का बसला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडीओमध्ये एक व्यक्ती बडवायझर बियर कंपनीची बाटली हलवताना दिसत आहे. या बाटलीत एक मेलेली पाल तरंगताना दिसत आहे. या घटनेनंतर दोघांनीही स्थानिक प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. वाईन शॉप मालकाने या घटनेची जबाबदारी टाळत ही बाब दारू पुरवठादारावर ढकलली आहे. याबाबत बडवायझर कंपनीकडून उत्तर मागितले आहे. कंपनीने याबाबत चौकशी करून माहिती दिली जाईल, असे म्हटले आहे.