न्यायालयाच्या आदेशानंतरही शाहजहाँचा ताबा नाहीच

पश्चिम बंगाल पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात धाव

 Evenafterth courtorder,ShahJahanisnotinpossession

न्यायालयाच्या आदेशानंतरही शाहजहाँचा ताबा नाहीच

#कोलकाता

कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही संदेशखाली प्रकरणातील आरोपी शेख शाहजहाँ याचा ताबा सीबीआयकडे देण्यास पश्चिम बंगाल पोलिसांनी नकार दिला आहे. याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकराने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत नाही, तोपर्यंत आरोपीचा ताबा सीबीआयकडे देता येणार नाही, असे पश्चिम बंगाल पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

५ जानेवारी रोजी संदेशखाली येथे ‘ईडी’ अधिकाऱ्यांवर जमावाने केलेल्या हल्ल्याचा तपास करण्यासाठी राज्य पोलिसांबरोबर केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संयुक्त विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे असा आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय पीठाने १७ जानेवारीला दिला होता. त्याविरोधात ‘ईडी’ आणि राज्य सरकारने उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकरणी मंगळवारी (५ मार्च) कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी याप्रकरणातील आरोपी शेख शाहजहाँ याचा ताबा सीबीआयकडे सोपवावा, असे आदेश उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल पोलिसांना दिले होते. तसेच सर्व पुरावे, दुपारी चारपर्यंत सीबीआयकडे हस्तांतर करावे, असेही उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते.

कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयचे अधिकारी शेख शाहजहान याचा ताबा घेण्यासाठी भाबनी भवन येथील पश्चिम बंगाल पोलिसांच्या मुख्यालयात पोहोचले. मात्र, त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. याप्रकरणी आता पश्चिम बंगाल पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून लवकरच यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित रेशन वितरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ५ जानेवारी रोजी ईडीचे पथक तृणमूल काँग्रेसचे माजी नेते शेख शाहजहाँ याच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यातील निवासस्थानी छापा टाकण्यासाठी जात होते. यावेळी रस्त्यातच ईडीच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता. तसेच अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. हा हल्ला शेख शाहजहाँ याच्या समर्थकांनी केल्याचा आरोप येत होता. याप्रकरणी शेख शाहजहाँ याला २९ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. याशिवाय शाहजहाँ आणि त्याच्या साथीदारांवर संदेशखालीतील अनेक महिलांनी लैंगिक छळ आणि जमीन हडप केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.वृत्तसंंस्था

 

संदेशखालीतील पीडित महिलांची मोदींनी घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्यांनी संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.  यावेळी आपल्यावर सोसाव्या लागलेल्या यातना त्यांनी कथन केल्या. दरम्यान, मोदींच्या या भेटीवरुन ते राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधानांनी उत्तर २४ परगाना जिल्ह्यातील बशीरहाटमध्ये एका सभेला संबोधित केले.  सध्या चर्चेत असलेले संदेशखाली हे ठिकाणही याच जिल्ह्यात येते. त्यामुळे मोदींनी या दौऱ्यात संदेखालीतल्या पीडित महिलांची भेट घेतली. यावेळी पीडित महिलांनी मोदींसमोर आपल्या वेदना बोलून दाखवल्या. त्यांचे म्हणणे पंतप्रधानांनी शांतपणे ऐकून घेतले,  अशी माहिती भाजपच्या नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest