प्रमुख विरोधी पक्षांच्या भूमिकांबाबतच साशंकता
#बंगळुरू
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीचे पडघम देशभर वाजू लागले आहेत. विरोधक भाजपाविरोधात आघाडी उभी करण्यासाठी प्रयत्न करत असताना या प्रमुख विरोधी पक्षांच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त करत माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) राष्ट्रीय अध्यक्ष एच.डी. देवेगौडा यांनी विरोधकांच्या ऐक्यावर भाष्य केले आहे.
पक्षाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना देवेगौडा यांनी आगामी राजकीय वाटचालीसोबतच भाजपविरोधात होऊ घातलेल्या विरोधकांच्या संभाव्य ऐक्याबाबतही आपले विचार मांडले आहेत. या देशातील असा कोणता पक्ष आहे, जो भाजपाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडला गेलेला नाही, असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस कदाचित यावर वाद घालू शकते. त्यांनी कधीही भाजपाला पाठिंबा दिला नाही, असे ते म्हणू शकतात. पण त्यांनी एम. करुणानिधी यांना पाठिंबा दिला नव्हता का? त्या वेळी सहा वर्षं त्यांना (भाजपाला) कुणी पाठिंबा दिला. अशा प्रकारची अनेक उदाहरणे आहेत. कधी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे असा पाठिंबा दिला गेला आहे. म्हणूनच मी या विषयावर चर्चा करू इच्छित नाही. या देशातील प्रचलित राजकारणाच्या वातावरणावर मी वाद घालण्याचे कोणतेही कारण नाही. मला हा देश चांगलाच माहीत आहे. मी १९९१ पासून विविध पदांवर काम करत आलो आहे. पंतप्रधानपद, मुख्यमंत्री आणि खासदार म्हणूनही काम केले. या काळात मी ही संपूर्ण प्रक्रिया पाहिली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जातीयवादाची व्याख्याही तपासावी लागेल
जातीयवादी आणि सांप्रदायिक भाजपसोबत हातमिळवणी करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना देवेगौडा म्हणाले की, या देशात कोण सांप्रदायिक आहे, कुणी नाही. हे मला माहीत नाही. सर्वात पहिल्यांदा सांप्रदायिकतेची व्याख्या ठरवायला हवी, टी संकुचित असू शकत नाही. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाशी युती करणार का, या प्रश्नावर उत्तर देताना देवेगौडा म्हणाले की, आम्ही लोकसभेआधी होत असलेल्या बंगळुरु स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत आहोत.