निहंग आणि पोलिसांमध्ये अमृतसरला चकमक
#अमृतसर
अमृतसरमध्ये शनिवारी रात्री उशिरा लढाऊ पंथाचे निहंग व पोलिसांमध्ये चकमक झाली. प्रकरणाची तीव्रता वाढल्यावर अतिरिक्त पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. मोठ्या संख्येने पोलीस आल्याचे पाहून निहंगांनी वाहनांतून पळ काढला. पोलिसांनी तेजबीर सिंग नामक निहंगाची ओळख पटवत २० अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, बटाळा येथेही निहंगांची दंड देण्यावरून पोलिसांशी बाचाबाची झाली.
पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना सुलतानविंड रोड येथे घडली. या ठिकाणी रात्री पोलिसांकडून तपासणी सुरू होती. तेवढ्यात आरोपी तेजबीर सिंग निहंग बाने येथे पोहोचला. त्याच्यासोबत ३-४ वाहनांत जवळपास दोन डझन निहंग होते. पोलिसांनी थांबवताच आरोपी व इतर निहंगांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. स्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. त्यानंतर पोलिसांचे पथक येताच आरोपी निहंगांनी वाहनांतून पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
बटाला येथेही वाद
गुरुदासपूरच्या बटाला येथील गांधी चौकात निहंग आणि पोलिसांमध्ये वाद झाला. वाहनांची तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, एका मोटारसायकलवरून २ निहंग आले. पोलिसांनी त्यांना कागदपत्रे मागितली. मात्र, त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि कागदपत्रे नव्हती.
निहंगांनी असा युक्तिवाद केला की, संपूर्ण देशात निहंगांकडे परवाना नसतो. तसेच कोणीही निहंगांचे चलान कापत नाही. या वादामुळे निहंगांनी तेथे धरणे सुरू केले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदतीला धावून जावे लागले.