'आम्ही विनोदवीर नाही, तर विनोद करणारे अभिनेते'
मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रताप महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. त्याला विनोदवीर म्हटले जाते, पण पृथ्वीक स्वतःला विनोदवीर म्हणत नाही. महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेतील सगळे कलाकार विनोदवीर नाहीय. त्यांना विनोदवीर असे लेबल लावणे योग्य नाही, असे मत पृथ्वीकने व्यक्त केले.
पृथ्वीक म्हणाला, 'कोणतेही बॅनर छापताना आम्हाला विनोदवीर म्हटले जाते, पण आम्ही विनोदवीर नाही. आम्ही अभिनेते आहोत जे खूप चांगले विनोद करू शकतात, जे इमोशनल भूमिका करू शकतात, जे गंभीर व नकारात्मकही भूमिका करू शकतात, पण हा फरक लोकांना कळणे कठीण आहे. कारण आपण ते कधीच लोकांमध्ये बिंबवले नाहीय. आपण एखादी गोष्ट सांगत राहतो आणि मग तेच लोक बोलतात.'
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील आपल्या ‘शंकऱ्या’ या पात्राचा उल्लेख करत पृथ्वीक म्हणाला, 'मी माझ्या पात्रात कधीच कॉमेडी केली नाही. शंकऱ्या शीतलीच्या प्रेमात आहे, तो हसतो-बोलतो. तो जेव्हा शिवालीला काहीतरी बोलतो, तेव्हा तो विनोद वाटतो, पण तो विनोद नसतो, तो त्याच्या भावना व्यक्त करत असतो. खरे तर, तिथे कॉमेडी करण्याची गरज नाही, पण ती सिच्युएशन इतकी खरी करावी लागते की, अभिनेता म्हणून तो लोकांना अपील होतो.'
'सतत विनोद करायचे असतील, तर त्यासाठी तशा भूमिका कराव्या लागतील. ज्यात लेखकांना पंच लिहावेच लागतील. तुम्ही कॉमेडी करावीच असे नाही. फक्त तुम्हाला हुशारीने इथे मला अभिनय करायचाय किंवा इथे मला सीरिअस कॅरेक्टर करायचे आहे, मला माझे म्हणणं लोकांवर बिंबवायचे आहे हे कळले की, लोक तुम्हाला अभिनेता समजतात,' असेही पृथ्वीक म्हणाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.