संग्रहित छायाचित्र
गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांचे नाव ३१ वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्मासोबत जोडले जात आहे. शिवांगीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ७० वर्षीय गोविंद यांच्यासोबतचा फोटो शेअर करत खळबळ उडवली. तिने हे फोटो शेअर करत, 'प्रेमात वय नसतं आणि कोणतीही मर्यादा नसते' अशी कॅप्शन दिली आहे.
शिवांगीची ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. त्यांचा फोटो पाहून अनेकजण ते एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले. आता या सगळ्यावर गोविंद यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. गोविंद यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हायरल होणारे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी त्यांचे नाते हे केवळ कामासंबंधीत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांचे केवळ पत्नी सुधा नामदेववर प्रेम असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. सध्या सुरु असलेल्या या सर्व अफवा आहेत.
शिवांगीने शेअर केलेला फोटो गोविंद यांनी पुन्हा शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी, 'हे रिअल लाईफ लव्ह नाही, रील लाईफ आहे. गौरीशंकर गोहरगंडवाले यांचा एक चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण आम्ही इंदूरमध्ये करत आहोत. हे त्याच चित्रपटाचे कथानक आहे.
यात एक म्हातारा एका तरुण अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. हे व्हायरल होणाऱ्या फोटोमागचे सत्य आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्यांदा प्रेमात पडणे मला शक्य नाही' असा खुलासाही गोविंद यांनी केला आहे. माझी पत्नी, सुधा माझ्या आयुष्याचा श्वास आहे. माझ्या संसारातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक लाभ-लोभ, अगदी स्वर्गही तिच्यापुढे फिका आहे.
जर मी इतर कुणाचा विचार केला तर मला देवाशी लढावे लागेल. काहीही झाले तरीही मी तिची साथ सोडू शकत नाही. गोविंद नामदेव यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारलेली आहे. सत्या, सिंघम, बँडिट क्वीन यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले असून त्यांचे कामही चांगलेच गाजले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.