संग्रहित छायाचित्र
मराठीसह हिंदी आणि अनेक इतर भाषांमध्ये काम करणारे बहुआयामी अभिनेते म्हणजे अतुल कुलकर्णी. अतुल कुलकर्णींनी आतापर्यंत वेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘हे राम’, ‘बम बम बोले’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘७०६’, ‘चांदनी बार’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘नटरंग’ अशा अनेक चित्रपट, वेब सीरिजमधून अतुल कुलकर्णींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता एका मुलाखतीत त्यांनी १० वर्षांपासून मराठी सिनेमांपासून दूर असण्याचे कारण सांगितले आहे.
१० वर्षे झाली मराठी सिनेमा केलेला नाही. मी लांब राहतोय, असे मात्र जाणूनबुजून करत नाही. तशी स्क्रिप्ट आली नाही, तशी संधी आली नाही, हे त्याचे खरे कारण आहे. एक ऑफर आली होती; पण ती माझ्या हातातून गेली. ‘मानवत मर्डर’साठी मला आदिनाथ आणि आशीष बेंडे यांनी फोन केला होता. मला ती कल्पना खूपच आवडली होती.
त्या भूमिकेसाठी मी खूपच उत्सुक होतो. खूप दिवसांत मराठीत काही करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे या प्रोजेक्टसाठी मी उत्सुक होतो. त्यादरम्यान सिनेमा करत होतो. त्यात काही वेळ गेला. ‘मानवत मर्डर'साठी मी विचारणा केली तर माझ्या मॅनेजरने सांगितले की माझी भूमिका आता आशुतोष गोवारीकर करत आहेत. मला वाईट वाटले.
मी तेवढा बरा नट नसेन हा भाग मी अगदीच मान्य करतो. मी त्या भूमिकेला सूट होत नाही, असे असू शकते. मला का वाईट वाटले याचे मुख्य कारण असे होते की, मला या दोघांनीही मी या प्रोजेक्टमध्ये नसल्याचे कळवले नाही. कारण- तुम्ही एखाद्या गोष्टीत मन गुंतवता आणि ते असे कुठून तरी बाहेरून कळल्यानंतर वाईट वाटते.
याबद्दल पुढे बोलताना अतुल कुलकर्णींनी हसत म्हटले की, मग मी त्याचा राग आशुतोषवरच काढला. मधे आम्ही आमिरकडेच भेटलो. त्याला म्हटले की, आता आम्ही भूमिकेसाठी दिग्दर्शकाबरोबर स्पर्धा करायची का? त्यावर तो म्हणाला की, लेखकांनी नाही का तुझ्याबरोबर लालसिंह चड्ढाची गोष्ट लिहिताना स्पर्धा केली. मराठी ही माझी मातृभाषा आहे. मला नक्कीच मराठीमध्ये काम करायला आवडेल, असेही अतुल कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.