‘उ तो वापस लगाय दें भैया’ !
अमिताभ बच्चन ऊर्फ बीग बी यांची अभिनय क्षेत्रातील महानता सांगण्याची गरज नाही. या वयातही विविध उपक्रमात ते कार्यमग्न असतात. एवढे असून अमिताभ सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांशी संवाद साधणे, आपले फोटो शेअर करणे, आपली मते मांडणे यासाठी सोशल मीडियाचा प्रामुख्याने ट्विटरचा ते वापर करतात. ट्विटरने गुरुवारी एकाएकी अनेकांच्या खात्यावरील ब्ल्यू टीक काढून टाकली. आता यामध्ये शाहरुख खान, आलिया भट्ट, दीपिका पदुकोन, सलमान खान यांच्यासह अमिताभ आणि अनेक तारे-तारकांचा समावेश आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरील ब्ल्यू टीक काढून टाकल्याने अमिताभ यांनी अतिशय मजेशीर प्रतिक्रिया नोंदवली आहे. या प्रतिक्रियेची आज दिवसभर चर्चा होत होती.
ॲलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर त्यात त्यांनी अनेक बदल केले आहेत. त्यानुसार ज्यांनी ट्विटर ब्ल्यूचे पैसे भरले आहेत त्यांच्याच नावापुढे ब्ल्यू टीक दिसणार आहे. ज्यांनी गुरुवारी रात्री ब्ल्यू टीक गमावली त्यापैकी अनेकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. अमिताभ यांनीही आपली प्रतिक्रिया हिंदीमध्ये नोंदवली असून त्यात त्यांनी पैसे भरल्याचा उल्लेख केला आहे. पैसे भरल्यामुळे ट्विटरने आता आपल्या नावावरील ब्ल्यू टीक पुन्हा चालू करावी, जेणेकरून आपल्या चाहत्यांना हे आपले अधिकृत खाते असल्याचे कळेल असे ते म्हणतात.
अमिताभ यांची ब्ल्यू टीक गेल्यानंतरची प्रतिक्रिया अतिशय मजेशीर आहे. ते म्हणतात की, ए ट्विटर भइया! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम... तो उ जो नील कमल होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया, ताकि लोग जान जायें की हम ही हैं - अमिताभ बच्चन ... हाथ तो जोड़ लिये रहे हम । अब का, गोड़वा जोड़े पड़ी का ??”
दरम्यान, आदिती राव हैदरीनेही ब्ल्यू टीक गेल्यानंतर प्रतिक्रिया नोदवली आहे. ती म्हणते की, एक काळ असा होता की ब्ल्यू टीक आपल्या नावापुढे असायची... हो ना @ ट्विटर आणि आम्ही सुखाने दिवस घालवत होतो ?