'ट्रोलिंग'ने फरक पडत नाही
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजच्या तिसऱ्या पर्वामुळे चर्चेत आहे. याशिवाय लवकरच ती आणखी एका सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचे नाव ‘रफूचक्कर’ असून, यात मनीष पॉल मुख्य भूमिकेत आहे. ही वेबसीरिज १५ जूनपासून जिओ सिनेमावर पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने प्रिया बापटने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने 'ट्रोलिंग' व 'बॉडी शेमिंग'बद्दल भाष्य केले आहे.
ट्रोलिंग व बॉडी शेमिंगला कशी सामोरी जातेस, या प्रश्नावर प्रिया म्हणाली, “मी खरंच आता ट्रोलिंगला गांभीर्याने घेत नाही. मला या टप्प्यावर यायला थोडा वेळ लागला जिथे मी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करते. आता त्यांचा माझ्यावर परिणाम होत नाही. मग ते बॉडी शेमिंग असो की माझ्या कामाबद्दल ट्रोलिंग असो, आता ट्रोलर्सच्या बोलण्याचा मला काहीच फरक पडत नाही.”
पुढे ती म्हणाली की, “प्रत्येक कलाकारासाठी या टप्प्यावर पोहोचणे खूप महत्त्वाचे आहे. कारण तेव्हाच तुम्ही तुमच्या कामावर आणि तुमच्या कलेवर लक्ष केंद्रित करू शकाल. ते आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. अनेक अभिनेत्यांनी हे सिद्ध केले आहे की, तुम्ही सडपातळ असाल किंवा लठ्ठ असाल, तरीही तुमचा अभिनय महत्त्वाचा असतो. त्यामुळे जोपर्यंत माझे कुटुंब माझ्यावर टीका करत नाही तोपर्यंत मी आनंदी आहे. ट्रोलर्सनी ट्रोल केले, तर मी ते वाचून सोडून देते, त्याचा विचार करत नाही.”
दरम्यान, दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या प्रिया बापटने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट व सीरिजमध्ये काम केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.