नसीरुद्दीन शाह यांच्यावर तिवारींनी सोडले टीकास्त्र
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेबसीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीमध्ये ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाबद्दलही उघडपणे भाष्य केले आहे. हा चित्रपट पाहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तसेच, त्यांनी या चित्रपटाला 'धोकादायक ट्रेण्ड' असल्याचेही म्हटले होते. नसीरुद्दीन यांच्या या विधानावरून भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी संतापले आहेत. तिवारी यांनी नसीरुद्दीन शाह यांना चांगलेच सुनावले आहे.
मनोज तिवारी यांना नसीरुद्दीन शाह यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “ते चांगले अभिनेते आहेत, पण त्यांचा हेतू चांगला नाही आणि मी खूप जड अंत:करणाने हे सांगत आहे. दुकानात बसलेला एक भटका माणूस येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांची छेड काढायचा, असे चित्रपटांमध्ये दाखवले जात होते. तेव्हा नसीरसाहेबांनी आवाज का उठवला नाही”, असा प्रश्नही मनोज तिवारी यांनी विचारला आहे.
तिवारी पुढे म्हणाले,” ‘द केरला स्टोरी’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ हे सत्यकथेवर आधारित चित्रपट आहेत. ‘त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. कोणत्याही गोष्टीवर आपली प्रतिक्रिया देणे खूप सोपे आहे. ते ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यावरून त्यांनी भारतीय नागरिक आणि माणूस म्हणून चांगली ओळख निर्माण केलेली नाही,” असेही तिवारी म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.