‘त्याला राजकारण सहन झाले नाही’!
अभिनेता मनोज वाजपेयीनं दिवंगत अभिनेता सुशांत सिंगबाबत खळबळजनक माहिती दिली असून बॉलिवूडमधील घटना सुशांतच्या आकलनापलीकडच्या होत्या, असे तो म्हणतो. सुशांतच्या आत्महत्येनं मला मोठा धक्का बसला. तो असे काही करेल असे वाटत नव्हते. सोनचिडीया या चित्रपटावेळी त्याच्याशी चांगली मैत्री झाल्याचे सांगून मनोज म्हणतो की, आमच्यात चांगला संवाद होता. मी सेटवर नेहमीच मटन बनवायचो. सुशांत त्यावर ताव मारायचा. त्याच्या आत्महत्येनंतर मी खूपच अस्वस्थ होतो. सुशांतला बॉलिवूडमधील राजकारण सहन झाले नाही. बॉलिवूडमध्ये मोठे राजकारण आहे. तुम्ही यशस्वी झाल्यानंतर हे राजकारण आणखीनच गंभीर होते, तीव्र होते. हे मला दिसून आल्याने याबाबत मी अधिकारवाणीनं सांगू शकतो. मला कधीच या गोष्टींचा फरक पडलेला नाही. मात्र सुशांतला मात्र सहन करणे अवघड होत होते. तो याबाबत माझ्याशी बोललाही होता. मला असे वाटते या राजकारणाचा त्याच्यावर परिणाम झाला होता.
आता मनोजने बॉलिवूडमधील नेपोटिझमवरदेखील खुलेआम भाष्य केले आहे. तो म्हणतो की, तुम्हाला जर मनोज वाजपेयी व्हायचे असल्यास तुम्हाला बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज नाही. मी तर त्याचा अजिबातच विचार करत नाही. मला ते आवडतही नाही. मी आतापर्यंत मोठ्या कष्टानं माझे स्वप्न पूर्ण केले आहे. माझी वाटचाल मोठी आहे. त्यामुळे मला कुणाला फार महत्त्व देण्याची गरजही वाटत नाही. परखड बोलणं अनेकांना वाईट वाटेल. मात्र, त्यामागे कित्येक वर्षांची मेहनत आहे. हे अनेकांना कळत नाही. ते सोयीनं विसरतात. हल्ली सगळ्यांना कौतूक हवे आहे. त्यांना कुणी त्यांच्याविषयी बदल सुचवले तर त्यांना ते माहिती नसते. यामुळेच की काय प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.