शर्मिष्ठाचा डंका निर्मिती क्षेत्रात
सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, अनुजा साठे, सौरभ गोखले, क्षिती जोग, अमेय वाघ, जितेंद्र जोशी, शशांक केतकर, वैदेही परशुरामी अशा बऱ्याच मराठी कलाकारांनी हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे आजकाल हिंदी चित्रपट, वेब सीरिजमध्ये मराठी कलाकार पाहायला मिळत आहेत. लवकरच निर्मिती क्षेत्रात सध्या आघाडीवर नाव असणारी मराठी अभिनेत्री हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.
या मराठी अभिनेत्रीने गेल्या वर्षी एका लोकप्रिय मालिकेची निर्मिती करत निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर आता लवकरच तिची पहिली निर्मिती असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शिवाय तिची निर्मिती असलेली आणखी एक मालिका लवकरच सुरू होणार आहे. निर्मिती क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी ही मराठी अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही शर्मिष्ठाची पहिली निर्मिती असलेली मालिका आहे. ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळे या मालिकेच्या यशानंतर शर्मिष्ठाची दुसरी निर्मिती असलेली मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अलीकडेच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला. ज्यामध्ये अभिनेता राकेश बापट प्रमुख भूमिकेत झळकला. या मालिकेसह शर्मिष्ठाची निर्मिती असलेला पहिला चित्रपट ‘नाच गं घुमा’चे सध्या चित्रीकरण सुरू आहे. शर्मिष्ठा हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. शर्मिष्ठाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री ‘रायसिंघानिया वर्सेज रायसिंघानिया’ या हिंदी वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘रायसिंघानिया वर्सेज रायसिंघानिया’ या कोर्ट ड्रामा सीरिजमध्ये अभिनेत्री जेनिफर विंगेट, करण वाही, रीम शेख, संजय नाथ अशी तगडे कलाकार मंडळी आहेत. या सीरिजचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.