'शक्तिमान' लवकरच येणार मोठ्या पडद्यावर
नव्वदच्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शक्तिमान. या मालिकेमध्ये अभिनेता मुकेश खन्ना यांनी शक्तिमानची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा हीच जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे, पण या वेळी ‘शक्तिमान’ मालिका नव्हे, तर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मुकेश खन्ना यांनी याबाबत माहिती दिली आहे.
‘शक्तिमान’ चित्रपटासाठी मुकेश खन्ना यांनी गेल्या वर्षी ‘सोनी पिक्चर्स इंडिया’शी हातमिळवणी केली होती. सोनी पिक्चर्सने टीझर व्हीडीओ शेअर करत लवकरच ‘शक्तिमान’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होती. आता या चित्रपटाबाबत मुकेश खन्ना यांनी मोठी माहिती दिली आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनेल भीष्म इंटरनॅशनलवर त्यांच्या आगामी ‘शक्तिमान’ चित्रपटाबाबत अनेक खुलासे केले आहेत. मुकेश खन्ना म्हणाले, ‘शक्तिमान’ चित्रपटाबाबत करार करण्यात आला आहे. हा अतिशय उच्च दर्जाचा चित्रपट आहे. चित्रपटावर २०० ते ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, तसेच हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठीही मोठी योजना आखण्यात येत आहे.
मुकेश खन्ना पुढे म्हणाले, हा चित्रपट बनवण्याची घोषणा मी केली होती. मात्र, करोनामुळे या चित्रपटाचे काम थांबवण्यात आले आहे. स्पायडरमॅन बनवणारी कंपनी ‘सोनी पिक्चर्स’ हा चित्रपट बनवणार आहे. मात्र, या चित्रपटात शक्तिमानची भूमिका नेमकी कोण साकारणार याबाबत मुकेश खन्ना यांनी अद्याप खुलासा केला नाही. २०२२ मध्ये ‘सोनी पिक्चर्स’ने टीझर शेअर करून ‘शक्तिमान’ चित्रपटाची घोषणा केली होती. यामध्ये ‘शक्तिमान’ हा सुपरहिरो ट्रायलॉजी म्हणून मोठ्या पडद्यावर आणत असल्याचे सांगण्यात आले होते. या चित्रपटात शक्तिमानची भूमिका रणवीर सिंग साकारणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.