सान्याची ड्रिम फिल्म!
आमिर खानच्या दंगलमधून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतलेली सान्या मल्होत्रा तुम्हाला आठवते? दंगलनंतर ती फार मोठ्या चित्रपटात दिसली नव्हती. अशी ही सान्या पुन्हा चर्चेत आली आहे ती तिच्या नव्या चित्रपटामुळे. शाहरुखच्या खूप प्रतीक्षा असलेल्या जवान चित्रपटातून सान्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जवानचा पहिला लूक २०२२ मध्ये प्रदर्शित झाल्यापासून जवानबाबतची उत्सुकता वाढत चालली आहे. साऊथचा दिग्दर्शक ॲटली जवानचे दिग्दर्शन करत आहे. एवढे दिवस शांत राहिल्यानंतर जवानचे प्रदर्शन जवळ आल्याचे पाहून सान्याने आपले रहस्य उघड केले आहे. या वर्षीच्या प्रतिष्ठेच्या जवान चित्रपटात आपली भूमिका असल्याचे सांगताना सान्याने शाहरुख खानबरोबर काम करताना आपण कसे भारावून गेलो होतो त्याचेही सविस्तर वर्णन एका मुलाखतीत केले आहे.
सान्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, शाहरुख खानबरोबर काम करण्याची माझी प्रदीर्घ काळाची इच्छा होती. माझ्या दृष्टीने जवान ही ड्रिम फिल्म आहे. शाहरुख बरोबर काम करायला मिळाल्याने मी खूप भारावलेली आहे, असे सांगून ती म्हणते की, यापूर्वी मला अनेकदा जवानमध्ये मी काम करत आहे की नाही याविषयी प्रश्न विचारले जायचे. मात्र, त्यावेळी नेमके उत्तर देण्याचे धाडस माझ्यात होत नव्हते. आयुष्यात कधीतरी आपणाला शाहरुख खानबरोबर काम करण्याची संधी मिळेल असे मला वाटायचे. जवान माझ्या दृष्टीने सत्यात उतरलेले स्वप्न आहे. जवान मधील भूमिका ड्रिम रोल होता आणि जवानही ड्रिम फिल्म होती. केवळ शाहरुखच्या आसपास असणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे.
जवानमधील सान्याच्या भूमिकेचे शूटिंग २०२२ मध्ये संपलेले आहे. सध्या शाहरुख चित्रपटातील शूटिंगमध्ये मग्न आहे. नुकतेच त्याने नयनतारासमवेत मुंबईत शूटिंग केले. शूटिंगवेळी शाहरुख आणि नयनतारा डान्स करत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या चित्रपटात विजय सेथूपतीची महत्त्वाची भूमिका असून दीपिका पदुकोन विशेष भूमिकेत दिसणार आहे. जवान २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे यापूर्वी जाहीर झाले होते. आता शाहरुखने जाहीर केलेल्या नव्या तारखेनुसार चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.
दरम्यान, सान्या सध्या काथळ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सान्या ही विकी कौशल बरोबरच्या सॅम बहादूर चित्रपटात काम करत असून द ग्रेट इंडियन किचन या मल्याळी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही ती दिसणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.