सलमानचे १९ मजली हॉटेल
मुंबईतील एका मोक्याच्या जागी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याचे कुटुंब एक भव्य आलिशान हॉटेल बांधत आहेत. बांद्रामधील कार्टर राेडवरील समद्राला खेटून असलेल्या या भूखंडावर हॉटेल बांधले जाणार आहे. याच्या बांधकामाला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. बांधकामाच्या नकाशानुसार हे हॉटेल १९ मजली असणार आहे. या जागेवर कधीकाळी स्टारलेट नावाच्या निवासी इमारतींचा संकुल होता. या इमारती खान कुटुंबाने विकत घेतल्या आहेत, प्रारंभी येथे हा भूखंड विकसित करून इमारती बांधण्याचा विचार होता. मात्र, आता यात बदल करून हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
सलमान खान यांच्या मातोश्री सलमा खान यांच्या नावावर हा भूखंड आहे. येथे हॉटेल बांधण्याचा प्रस्ताव वर्षापूर्वी सादर केला होता. याच्या नकाशानुसार येथे तीन मजली बेसमेंट असून पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कॅफे आणि रेस्टॉरंट आहे. तिसऱ्या मजल्यावर जिम्नॅशियम, जलतरण तलाव असून चौथा मजला सर्व्हिस फ्लोअर म्हणून वापरला जाईल. ५ व्या आणि ६ व्या मजल्यावर कन्व्हेंशन सेंटर असून बाकीच्या ७ ते १९ व्या मजल्यांचा वापर हॉटेलसाठी होणार आहे. याबाबत सलमान खानच्या गोटातून कोणताही दुजोरा दिला गेला नाही. तसेच या भूखंडावर बांधकामाच्या कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. सध्या तेथे पूर्वीच्या इमारती आहेत. बांधकाम सुरू झाल्यावर त्याचे पाडकाम सुरू होईल.
दरम्यान, सलमान खानचा नुकताच किसी का भाई, किसी की जान हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. फरहाद सामजीचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सलमान समवेत पूजा हेगडे, वेंकटेश, जगपती बाबू, राघव जुयाल, शहनाज गिली, पलक तिवारी आदींच्या भूमिका आहेत. सध्या सलमान कॅटरिना कैफ समवेत टायगर-३ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.