‘शिवराज अष्टका’तील 'रामशेज' लवकरच रसिकांच्या भेटीला
मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. गेल्या काही वर्षात प्रदर्शित झालेले ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यानंतर आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याची माहिती देणारा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून ‘रामशेज’ या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘मुरारबाजी’ चित्रपटाचे निर्माते ‘रामशेज’ चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात येईल.
‘रामशेज’ किल्ला नाशिकपासून १६ किलोमीटरच्या अंतरावर असून, मराठ्यांनी साडेसहा वर्षे मुघलांविरुद्ध हा किल्ला लढवला होता. प्रभू श्रीराम लंकेला जात असताना त्यांचे या किल्ल्यावर वास्तव्य असल्याने या किल्ल्याचे नाव ‘रामशेज’ असे ठेवण्यात आले, अशी आख्यायिका आहे. या आख्यायिकेप्रमाणे, चित्रपटाच्या पोस्टरमध्येही शिवाजी महाराजांचा मावळा आणि त्यामागे प्रभू श्रीरामांची छाया दाखवण्यात आली आहे.
‘रामशेज’ चित्रपटात अभिनेता अंकित मोहन प्रमुख भूमिका साकारणार असून, हरीश दुधाडे, प्राजक्ता गायकवाड यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल ‘हर हर महादेव’ अशी माहिती अंकित मोहनने पोस्ट शेअर करीत दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.