संग्रहित छायाचित्र
अलीकडेच अशी बातमी आली होती की साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने ‘रामायण’ चित्रपटासाठी मांसाहार सोडला आहे. मात्र, साई पल्लवीने हे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील तिने दिला आहे.
साई पल्लवीनेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक लांबलचक नोट लिहून टीका केली आहे. तिने लिहिले की, ‘‘जेव्हा मी सोशल मीडियावर कोणतीही चुकीची बातमी पाहते, तेव्हा मी त्याकडे दुर्लक्ष करून गप्प बसण्याचा प्रयत्न करते. पण आता काही खोट्या बातम्यांवर माझी प्रतिक्रिया देण्याची वेळ आली आहे, असे दिसते. कारण खोटे सतत पसरवले जाते आणि ते थांबत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, हे माझ्या चित्रपटांच्या रिलीज, घोषणा किंवा माझ्या कारकिर्दीतील संस्मरणीय क्षणांच्या आसपास घडते. त्यामुळे पुढच्या वेळी मला कोणतेही प्रसिद्ध पेज किंवा मीडिया असे करताना दिसले, तर मला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल.’’
एका तमिळ दैनिकाने आपल्या बातमीत म्हटले होते की, साई पल्लवी ‘रामायण’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारत आहे आणि यामुळे तिने मांसाहार सोडला आहे. याशिवाय असाही दावा करण्यात आला होता की, साई पल्लवी जेव्हाही प्रवास करते तेव्हा ती फक्त शाकाहारी जेवणालाच प्राधान्य देते.
साई पल्लवीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘‘मी कायम शाकाहारी आहे. कोणताही प्राणी मेला की ते सहन करू शकत नाही. मी कोणालाही दुखवू शकत नाही आणि ते ठीक आहे, असे मला वाटत नाही. ’’
‘रामायण’ या चित्रपटात रणबीर कपूर रामाची तर साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत आहे. याशिवाय टीव्ही अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार असून त्यातील पहिला भाग २०२६ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर तर दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.