संग्रहित
अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत सध्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. एका मुलाखतीत कंगनाने सलमान खानला तिचा चांगला मित्र म्हटले आहे.सलमानसोबत काम करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण आजपर्यंत तसे होऊ शकले नाही, असे ती म्हणाली. असे असले तरी भविष्यात सोबत काम करण्याची संधी नक्कीच मिळेल, अशी आशा कंगनाने व्यक्त केली.
सलमानसोबतच्या नात्याबद्दल बोलताना कंगना म्हणाली, ‘‘सलमान माझा चांगला मित्र आहे. आम्हाला अनेक संधी आल्या आहेत, जेव्हा आम्ही एकत्र काम करू शकलो असतो. परंतु काही कारणास्तव आम्ही आजपर्यंत एकत्र काम करू शकलो नाही. पण मला आशा आहे की लवकरच आम्ही दोघे एकत्र काम करू.’’
यापूर्वी एका मुलाखतीत कंगना म्हणाली होती की, ‘‘सलमानने मला ‘बजरंगी भाईजान’मध्ये रोल ऑफर केला होता. मी आश्चर्यचकित होऊन त्याला विचारले, मला कोणती भूमिका दिलीस? त्यानंतर ‘सुलतान’ चित्रपटाच्या वेळीही त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. मी तेही घेतले नाही. अशा स्थितीत त्यांनी मला विचारले, आता तुला आणखी काय देऊ?’’
कंगनाच्या म्हणण्यानुसार, तिने सलमानची ऑफर नाकारली असली तरी सलमान नेहमीच तिच्याशी चांगला वागतो आणि तिच्याशी बोलत राहतो. सलमान ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक असल्याचेही कंगनाने सांगितले. इमर्जन्सी हा चित्रपट येत्या शुक्रवारी (दि. १७) प्रदर्शित होणार आहे