Arvind Pilgaonkar passed away
मराठी संगीत रंगभूमीवर स्वतः ची विशेष छाप पाडणारे ज्येष्ठ गायक –अभिनेते अरविंद पिळगावकर काळाच्या पडद्याआड. पिळगावकर यांचे वृद्धपकाळाने रविवारी निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई मराठी साहित्य संघाने सादर केलेल्या यशवंतराव होळकर या ऐतिहासिक नाटकाच्या माध्यमातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले आणि त्यानंतर ललितकलादर्श, कलावैभव, नाटयमंदार, रंगशारदा आणि चंद्रलेखा आदी नाट्यसंस्थांच्या अनेक नाटकांमधून विविध भूमिका त्यांनी साकारल्या.
यासोबतच, आकाशवाणी -दूरदर्शनसाठीही काम केले. संगीत मानापमान या नाटकात वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी धैर्यधर ही भूमिका साकारण्यासह लक्ष्मीधर ही भूमिकाही साकारली होती. पिळगावकर यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
पिळगावकर यांनी विल्सन महाविद्यालयातून ‘बी.ए.’ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात ‘लिपिक’ म्हणून नोकरी केली. या दरम्यान राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) मीना पेठे निर्मित ‘संगीत वासवदत्ता’ या नाटकात उदयन ही भूमिका साकारण्याची त्यांना संधी मिळाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने संगीत रंगभूमीवर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातील नोकरीचा राजीनामा देत त्यांनी पूर्णवेळ गायन व अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
अरविंद पिळगावकर यांनी विविध पौराणिक आणि संगीत नाटकांमधून काम केले. त्यांनी ‘नयन तुझे जादुगार’, ‘घन:श्याम नयनी आला’, ‘जय जगदीश हरे’, ‘धाडिला राम तिने का वनी’ तसेच ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मृच्छकटिक’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत शारदा’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत भावबंधन’, ‘संगीत स्वयंवर’, ‘संगीत पुण्यप्रभाव’, ‘संगीत एकच प्याला’ आदी संगीत नाटकांमधून काम करीत स्वतःची विशेष ओळख निर्माण केली. तसेच ‘संत कान्होपात्रा’, ‘संत नामदेव’, ‘भाव तोची देव’ आणि ‘आतून कीर्तन वरून तमाशा’, ‘विठो रखुमाय’, ‘दशावतारी राजा’ या लोकनाट्यांमधून तसेच काही वगनाट्यांतही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.