संग्रहित छायाचित्र
दिग्गज अभिनेत्री कंगना रनोट सध्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीत करण जोहरसोबत चित्रपटात काम करणार का, असा प्रश्न विचारल्यावर ‘‘त्याने माझ्यासोबत काम करावे, मी त्याला चित्रपटात चांगली भूमिका देईन,’’ अशी ऑफर कंगनाने दिली.
कंगना अलीकडेच ‘इमर्जन्सी’च्या प्रमोशनसाठी सिंगिंग रिॲलिटी शो ‘इंडियन आयडॉल १५’मध्ये गेली होती. यादरम्यान स्पर्धक मानुषी घोषने कंगनाला प्रश्न विचारला की, तिच्या आणि करणमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धानंतर तिला करणच्या धर्मा प्रॉडक्शनसाठी काम करायला आवडेल का? या प्रश्नाच्या उत्तरात कंगना हसत म्हणाली, ‘‘करण सरांनी माझ्यासोबत एक चित्रपट करावा. मी त्यांना खूप चांगली भूमिका देईन आणि खूप चांगला चित्रपट करेन. त्या चित्रपटात सासू आणि सून यांच्यातील गॉसिपिंग असणार नाही. हा एक योग्य चित्रपट असेल आणि त्यांना योग्य भूमिका मिळेल.’’
यापूर्वी २०१७ मध्ये कंगना करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण सीझन फाईव्ह’मध्ये गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत सहकलाकार सैफ अली खान आणि शाहिद कपूरदेखील उपस्थित होते. या शोमध्ये कंगनाने करण जोहरला खूप काही सांगितले होते. करण घराणेशाहीला प्रोत्साहन देतो, असे ती म्हणाली होती. या शोमध्ये करणने कंगनाला विचारले की ती तिच्या बायोपिकमध्ये खलनायकाच्या भूमिकेत कोण आहे. याला उत्तर देताना कंगनाने करणला अप्रत्यक्षपणे सांगितले होते की, तो नेहमी नेपोटिझमबद्दल बोलतो, त्यामुळे तिला कधीकधी धक्का बसला. याशिवाय कंगनाने अनेकवेळा करणबद्दल अप्रत्यक्ष कमेंट्स केल्या.
करणने सांगितले होते की, कंगनासोबत काम करणे त्याला आवडत नसल्याने त्याने तिच्यासोबत काम केले नाही. कंगनासोबत काम न करण्याचे कारण ती बाहेरची व्यक्ती आहे, असे नाही. कंगनाने गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तिने हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंग यांचा पराभव केला होता. कंगनाचा चित्रपट ‘इमर्जन्सी’ १९७५ ते १९७७ या २१ महिन्यांच्या कालावधीवर आधारित आहे. जेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात धोक्याचे कारण देत संपूर्ण देशात आणीबाणी जाहीर केली होती. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १७ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.