संग्रहित छायाचित्र
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस येथील जंगलात लागलेली आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. जंगलातील आग पॉश भागात पोहोचली आहे. अनेक हॉलिवूड स्टार्सचे बंगलेही जळाले आहेत. प्रसिद्धअभिनेत्री आणि गायिका पॅरिस हिल्टन यांचे घरही आगीत जळून खाक झाले आहे. स्वतःचे घर जळताना पाहिल्यावर पॅरिसने एक व्हीडीओ पोस्ट करून घर उद्ध्वस्त होताना पाहून माझे हृदय तुटले, अशी भावना व्यक्त केली आहे.
४३ वर्षीय पॅरिसने तिचे घर आगीत जळतानाचा व्हीडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने लिहिले, ‘‘मी इथे त्या ठिकाणी उभी आहे जिथे आमचे घर होते, माझे घर जळताना पाहून माझे हृदय तुटले आणि ते शब्दात व्यक्त करता येत नाही. ही बातमी मी पहिल्यांदा पाहिली तेव्हा मला धक्काच बसला. आता इथे उभं राहून हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर माझ्या हृदयाचे लाखो तुकडे झाल्यासारखे वाटते.’’
हे घर फक्त एक घर नव्हते, हे ते ठिकाण होते जिथे आम्ही स्वप्न पाहिले होते. या घरात फिनिक्सने तिच्या चिमुकल्या हातांनी वस्तू बनवल्या होत्या ज्या मला कायमस्वरूपी ठेवायच्या होत्या. हे घर राखेत बदलताना पाहणे फार कठीण आहे. ही फक्त माझी कथा नाही, लॉस एंजेलिसमध्ये आज जळणाऱ्या प्रत्येक घराची ही कहाणी आहे. अनेकांनी सर्वस्व गमावले आहे. फक्त भिंती आणि छप्पर नाही तर त्या आठवणींनी त्या घरांना घरं बनवली. हे फोटो आहेत, आठवणी आहेत,’’ अशा शब्दांत पॅरिसने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पॅरिसने अग्निशमन दल, स्वयंसेवक आणि फॅन्सचे आभार मानले. ती म्हणाली, ‘‘मी भाग्यवान आहे की माझे कुटुंब, माझी मुले आणि माझे पाळीव प्राणी सुरक्षित आहेत. या काळात माझ्या कुटुंबासाठी पाठिंबा आणि प्रार्थना करणाऱ्या सर्व फॅन्सचे आभार. तुम्हीच आहात ज्यांनी मला आठवण करून दिली की या जगात अजूनही सौंदर्य आहे.’’