Pimpri Chinchwad: ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील नाटकांनी गाजवले १०० वे नाट्य संमेलन
पिंपरी: शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दुस-या दिवशीही पिंपरी -चिंचवड शहरातील विविध नाट्यगृहात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील नाटकांनी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडल्याचे बघायला मिळाले.
ग.दि. माडगूळकर मुख्य सभागृहात वर्ध्याच्या ‘अध्ययन भारती’ या संस्थेने ‘तेरवं’ हे प्रायोगिक नाटक सादर केले. याचे लेखन श्याम पेठकर यांनी केले आहे तर हरिश इथापे यांनी हे संवदेनशील नाटक दिग्दर्शित केलंय. या नाटकांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकांची गोष्ट आहे. तसेच सादर करणाऱ्या सर्व बायकाच आहेत. त्यातही पाच जणी या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी आहेत, दोघी जणी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या मुली आहेत, तर सहा जणी या नाट्यसंस्थेतल्या आहेत. तेरा जणींनी मिळून प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे हे नाटक सादर केले.
'घाशीराम कोतवाल' या मराठीतील मैलाचा दगड असलेल्या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग नाट्य संमेलनात सादर करण्यात आला. विजय तेंडूलकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसमेंलनाचे अध्यक्ष डाॅ. जब्बार पटेल यांनी केले होते. देशासह विदेशातही डॉ. पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाने आपला अमिट ठसा उमटवलेला आहे. आज डाॅ. पटेल अध्यक्ष झाल्याने पांडव निर्मित या नाटकाचा खास प्रयोग नाट्यसमेंलनात ठेवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांनाही उदंड प्रतिसाद दिला.
पिंपळेगुरव येथील निळू फुले नाट्यगहात 'चाणक्य' या नाटकाचा प्रयोग रंगला. हिंदी रंगभूमीवर ‘चाणक्य’ हे नाटक खूप गाजलं आहे. या वेगळ्या धाटणीच्या नाटकाचा अनुभव मराठी नाट्यरसिकांनाही मिळावा म्हणून मागील वर्षी ‘चाणक्य’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणण्यात आले. या नाटकाचा खास प्रयोग १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात ठेवण्यात आला. अभिनेते शैलेश दातार चाणक्यच्या मुख्य भूमिकेत आहेत.तर दिग्दर्शन प्रणव जोशी यांनी केले आहे.या नाटकाचे मूळ लेखक मिहिर भुता असून, त्याचा मराठी अनुवाद शैलेश दातार यांनी केला आहे.
मध्यप्रदेशातील प्रायोगिक नाटक 'रा+धा' चा प्रयोग रंगला. रविंद्र लाखेंच्या कथेचे नाट्यरुपांतरण दिग्दर्शन श्रीराम जोग यांनी केले आहे. या नाटकात जीवन आणि स्त्री-पुरुष नातेसंबंधांचे तत्त्वज्ञान भावनांच्या आधारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रा+धा आणि घनश्यामच्या रंगमंचावरच्या उपस्थितीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदि मान्यवर उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.