नाव्या ट्रॅक्टरवर !
अमिताभ आणि जया बच्चन यांची नात नाव्या नवेली नंदा हिचा बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही इरादा नसल्याचे सध्या तरी दिसत आहे. महिलांसाठी आरोग्यविषयक तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या आरा हेल्थ या ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या स्टार्ट अप कंपनीची ती सह संस्थापक आहे. नाव्या अनेक वेळा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडेच तिने टाकलेल्या काही फोटोंमुळे तिच्यातील साधेपणा अधिकच उठून दिसतो. कधी ती भोपाळमध्ये चाट खाताना आपल्याला पाहावयास मिळते, तर कधी गुजरातमध्ये ती ट्रॅक्टर चालवताना दिसते. नाव्याच्या पोस्टमध्ये ताजेपणा असल्यामुळे तिच्या चाहत्यांना नावीन्याची एक मेजवानी असते. आपल्या गुजरात भेटीमधील काही वेगळे आणि अनोखे क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गुजरातमधील गणेशपुरा या गावाला दिलेली भेट नाव्याला भलतीच आवडलेली दिसते. या व्हीडीओमध्ये नाव्याने पांढऱ्या रंगाचा छापील नक्षीदार कुर्ता घातला असून त्यानंतर तेथील महिलांशी ती संवाद साधताना पाहायला मिळते. या महिलांशी बोलत असताना ती कॉटवर बसलेली आहे. याला नाव्याने गणेशपुरा, गुजरात अशी कॅप्शन दिली आहे. गहराईयाँ चित्रपटात काम केलेला अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी या पोस्टवर कमेंट करताना म्हणतो की, ‘नदिया के पार’. नाव्याची आई श्वेता बच्चन कमेंट करताना म्हणते की, खूपच छान. सोनाली बेंद्रे, माहिप कपूर, संदीप खोसला आदींनीही या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नाव्याच्या सोशल मीडियावरील व्यक्तिरेखेने नेटकरी खूपच भारावून गेले आहेत. तिचा साधेपणा, सच्चेपणा आणि डाऊन टू अर्थ अशी तिची वागणूक पाहून एक चाहता म्हणतो की, इतरांना ज्या मदतीने तू पाठिंबा देतेस आणि त्यातून तुझा जो साधेपणा दिसतो त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. दुसरा एक नेटकरी म्हणतो की, खूप सुंदर. तू जे काम करतेस त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यातच एका महिलेकडून तुला मिळालेली फुले म्हणजे तुझ्या कामाला मिळालेली पावती. अन्य एक चाहता म्हणतो की, डाऊन टू अर्थ.
अभिनय क्षेत्रात कारकीर्द करण्यास का उत्सुक नाही, या प्रश्नावर एका वृत्तसंस्थेशी बोलताना नाव्या म्हणाली की, प्रामाणिकपणे बोलायचे झाल्यास अभिनयात मला फार गती आहे किंवा ते गुण माझ्यात आहेत असे मला वाटत नाही. केवळ करायचे म्हणून काही करण्यात अर्थ नाही असे मला वाटते. जे आपल्याला भावते तेच करावे असे माझे मत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.