नवी एन्ट्री!
फरहान अख्तर आणि एक्सेल एंटरटेनमेंटने सोशल मीडियावर एक व्हीडीओ शेअर केला आहे. हा व्हीडीओ कियारा अडवाणीला टॅग करत त्यांनी कॅप्शन लिहिले, ‘‘डॉन युनिव्हर्समध्ये स्वागत आहे @kiaraaliaadvani’’
'डॉन' फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट 'डॉन ३'मध्ये शाहरुखच्या जागी रणवीर सिंग डॉनची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता निर्मात्यांनी प्रियांका चोप्राऐवजी कियारा अडवाणीला रणवीरसोबत चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक फरहान अख्तर असेल.
फरहानने एका मुलाखतीत सांगितले की, त्याला 'डॉन ३'च्या कथेला दिशा द्यायची आहे. तथापि, या मालिकेच्या शेवटच्या दोन भागांमध्ये मुख्य अभिनेता असलेला शाहरुख आणि त्याच्यात कथेवर एकमत झाले नाही. याच कारणामुळे फरहानने शाहरुखला चित्रपटातून काढून रणवीरसोबत काम करण्याचा निर्णय घेतला.
फरहान म्हणाला, ‘‘मी कोणाचीही जागा घेण्याच्या स्थितीत नाही. वर्षानुवर्षे आम्ही या गोष्टींवर चर्चा करत होतो. मला कथा वेगळ्या दिशेने घ्यायची होती. यावर शाहरुख आणि माझे एकमत नव्हते. यानंतर आम्ही आपापसात बोललो आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या मालिकेसाठी हे अधिक चांगले होईल, असे आम्हाला वाटले.
या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून शाहरुखच्या जागी संधी मिळालेल्या रणवीरला ट्रोल केले जाऊ लागले. यापूर्वी एका मुलाखतीत फरहानने रणवीरची बाजू घेत त्याला पाठिंबा दिला होता. तो म्हणाला होता की या भागासाठी रणवीर अप्रतिम आणि सर्वोत्कृष्ट आहे. तोदेखील सर्वांसारखाच उत्साही आणि चिंताग्रस्त आहे. द ग्रेट अमिताभ आणि शाहरुख खान यांनी साकारलेल्या या पात्रात तो स्वत:ला बसवण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र, रणवीर सिंगनेही ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. एका मुलाखतीत शाहरुख खानला रिप्लेस करण्याबाबत विचारले असता रणवीर म्हणाला होता, ‘‘बदल नैसर्गिक आहे, सिनेमाच्या इतिहासात यापूर्वीही असे घडले आहे. डॅनियल क्रेगला बाँड फ्रँचायझीमध्ये आणल्यावरही ही चर्चा झाली. ‘डाॅन’ ही हिंदी सिनेमाची सर्वात मोठी फ्रेंचाइजी आहे, त्याची कमान माझ्याकडे सोपविणे ही मोठी गोष्ट आहे. यामध्ये मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.