‘नताशाची कॉपी’
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यापूर्वी दोघे बऱ्याच काळापासून डेट करत होते. सध्या वरुण पत्नी नताशाबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. दरम्यान, गेले काही दिवस सोशल मीडिया स्टार कुशा कपिला आणि वरुणची पत्नी नताशा या दोघीही थोड्याफार सारख्याच दिसतात अशी चर्चा सुरू आहे. नेटकऱ्यांच्या या चर्चांना उत्तर देताना कॉमेडी क्वीन कुशा कपिलाने एक मजेशीर व्हीडीओ शेअर केला आहे.
कुशाने थेट वरुणबरोबरचा व्हीडीओ बनवत आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हीडीओच्या सुरुवातीला कुशा वरुणला धडकते, दोघेही बराच वेळ एकमेकांकडे पाहतात आणि गोंधळलेले दिसतात, अर्थात या ठिकाणी वरुणसुद्धा पत्नी नताशासारख्या दिसणाऱ्या मुलीला पाहून गोंधळला आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न दिसत आहे.
कुशाने या व्हीडीओमध्ये असंख्य यूजर्सच्या “नताशा आणि तू सारखी दिसतेस…” असे सांगणाऱ्या प्रतिक्रियांचे स्क्रिनशॉट्स जोडले आहेत. यामध्ये अनेक यूजर्स तिला “नताशा दलालची हुबेहूब कॉपी”, “जुडवा २ इन रिअल लाईफ” असे म्हणत आहेत. व्हीडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये नमूद करत कुशाने वरुण धवनचे आभार मानले आहेत. कुशाने शेअर केलेला हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, कुशा कपिला ही प्रसिद्ध इन्स्टाग्राम क्रिएटर म्हणून ओळखली जाते. तिचे एक यू ट्यूब चॅनेल देखील आहे. इंस्टाग्रामवर कुशाचे तब्बल ३.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्राम आणि यू ट्यूबवर कुशा नेहमीच असे मजेदार व्हीडीओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करीत असते. दुसरीकडे, वरुण धवन सध्या सिटाडेल या वेबसीरिजमध्ये व्यस्त आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.