पुरस्काराच्या अनादरामुळे नसीरुद्दीन ‘ट्रोल’
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या अभिनयासाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेबसीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेबसीरिजवरूनही बराच गदारोळ झाला होता, पण लोकांना ही सीरिज आवडली असून, तिचा दूसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नसीरुद्दीन यांच्या कामाचे नेहमीच कौतुक होत असते. त्यांनी केलेल्या भूमिकांसाठी त्यांना आतापर्यंत अनेक मोठे पुरस्कारही मिळाले आहेत. नुकतेच त्यांनी या पुरस्कारांबाबत केलेले एक वक्तव्य चांगलेच व्हायरल झाले होते. एका मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचा वापर त्यांच्या मुंबईजवळील फार्महाऊसच्या दरवाजांची हँडल्स म्हणून केला असल्याचे सांगितलं. या वक्तव्यातून त्यांनी ‘फिल्मफेअर’सारख्या पुरस्कार सोहळ्यावर टीका केल्याचा अंदाज लोकांनी वर्तवला.
नसीरुद्दीन यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी त्यांना ट्रोल केले आहे. आता अभिनेते मनोज बाजपेयी आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी नसीरुद्दीन यांचे वक्तव्य खोडून काढलं आहे. त्या दोघांनी नसीरुद्दीन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुभाष घई म्हणाले, “फिल्मफेअर हा एक प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांचा कधीच अनादर करू नये. मला स्वतःला त्याचे नामांकन बऱ्याचदा मिळाले आहे पण केवळ तीन वेळाच मला तो पुरस्कार मिळाला. त्या पुरस्कारासाठी मिळणारे नामांकनही त्या पुरस्कारइतके महत्त्वाचं असते.”
मनोज बाजपेयी यांनीही याबद्दल वक्तव्य केले. ते म्हणाले, “मी फिल्मफेअर सोहळे पाहतच लहानाचा मोठा झालो. इथे लोकांच्या कामाची दखल घेतली जाते, त्यांना ओळख मिळते. फिल्मफेअर ही माझ्या आयुष्यातील अत्यंत मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. माझ्या आयुष्याचा हा एक अमूल्य भाग आहे.” नसीरुद्दीन यांनी थेट फिल्मफेअरचे नाव घेतले नसले तरी त्यांचं हे वक्तव्य बऱ्याच लोकांना खुपले आहे. नसीरुद्दीन यांना आजवर ‘आक्रोश’, ‘चक्र’ आणि ‘मासूम’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.