लिओनार्दो डीकॅप्रियो नीलम गिलसोबत डेटवर
‘टायटॅनिक’ या जगप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटातील गाजलेला अभिनेता लिओनार्दो डीकॅप्रियो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. ४८ वर्षीय लिओनार्दो सध्या भारतीय वंशाची २८ वर्षीय मॉडेल नीलम गिल हिला डेट करीत असल्याची चर्चा आहे.
पेज सिक्सच्या रिपोर्टनुसार, नीलम गिल लंडनमधील एका रेस्तरॉंमध्ये लिओनार्दोसोबत डिनर करताना दिसली होती. मात्र, यावेळी त्याची आई आणि त्याचे काही मित्रही उपस्थित होते. तेव्हापासून दोघांच्या डेटिंगच्या अफवा उडू लागल्या.
नीलम गिल ही २८ वर्षांची मॉडेल असून तिचा जन्म १९९५ मध्ये इंग्लंडमधील कोव्हेंट्री येथे झाला होता. तिच्या आजी-आजोबांचा जन्म भारतात झाला. नीलम पंजाबमधील शीख कुटुंबातील आहे. स्वत:ला ब्रिटिश-पंजाबी मॉडेल म्हणणारी नीलम वयाच्या १४ व्या वर्षापासून मॉडेलिंग करत आहे. नीलम स्वतःचे एक यू ट्यूब चॅनलदेखील चालवते, त्यात ती गुंडगिरी, नैराश्य यावर मात करणे आणि शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास यांसारख्या विषयांवर भर देते.
नीलम मागील महिन्यात फ्रेंच रिव्हिएरा येथे झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. लिओनार्दोनेही त्याच्या ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी महोत्सवात हजेरी लावली होती. नीलमने अलीकडेच मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती.
नीलमच्या आधी लिओनार्दोचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. त्याने यापूर्वी कॅमिला मोरोनला डेट केले आहे. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या वर्षी त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर त्याचे नाव सुपर मॉडेल गिगी हदीदसोबतही जोडले गेले. आता लिओनार्दो नीलमला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.