'कोकण चित्रपट महोत्सव' रंगणार
कला, संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर म्हणजे कोकण.कलेची आणि कलाकारांची खाण म्हणजे कोकण.असंख्य कलाकार ह्या मातीत घडले आणि घडत आहेत. कोकणातल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने 'सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत 'कोकण चित्रपट महोत्सवा'ची सुरुवात केली आहे.
११ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये या महोस्तवाचा उदघाट्न सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर चित्रपटांचे प्रदर्शन आयोजण्यात आले आहे. १२, १३ व १४ डिसेंबरला मराठी चित्रपट दाखवण्यात येणार असून १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. १६ डिसेंबरला बक्षिस समारंभ आणि महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न होईल.
या कार्यक्रमासाठी वर्षा उसगांवकर, सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, प्रभाकर मोरे यांसारखे दिग्ग्ज कलाकार या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहून स्थानिक कलाकारांचे मनोबल वाढवतील. शिवाय संतोष पवार, पॅडी कांबळे, पूजा सावंत, संदीप पाठक, अभिजीत चव्हाण, दिगंबर नाईक, सुहास परांजपे, मेधा गाडगे, आरती सोळंकी, हेमलता बाणे आदी कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स या महोत्सवाला चारचाँद लावतील.
विशेष म्हणजे सिंधूरत्न कलावंत मंच संस्थेला महानायक श्री अमिताभ बच्चन यांनी पत्ररुपी तर अभिषेक बच्चन यांनी शब्दरूपी शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट महोत्सव रत्नागिरी, मालवण, कणकवली आणि वैभववाडी या चार तालुक्यांमध्ये होणार असून येथे आठ चित्रपट विनामूल्य दाखवण्यात येतील. या चित्रपट महोत्सवात कोकणात चित्रित करण्यात आलेले लघु चित्रपट तसेच व्हिडिओ सॉंग अल्बम यांना पारितोषिक देण्यात येतील. या संस्थेच्या अध्यक्षपदी विजय पाटकर, उपाध्यक्ष अलका कुबल, सचिव विजय राणे, कार्यवाह प्रकाश जाधव, प्रमोद मोहिते, यश सुर्वे आदी मंडळी आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.