'कन्नी'ने साजरी केली मकर संक्रांत
मकर संक्रांतीचे औचित्य साधत या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून या चित्रपटातील कलाकारांनी यानिमित्ताने एकत्र येत, मकर संक्रांतही साजरी केली. हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांनी पत्रकारांसोबत पतंग उडवण्याचा आनंद लुटला. मजा, मस्ती, धमाल, कल्लोळाने वातावरण चैतन्यमय झाले होते. कलाकारांमध्ये कोण कोणाची पतंग कापणार, यात चुरसही लागली होती. यावेळी कलाकारांनी उपस्थितांना तिळगुळ देत, मकरसंक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या.
नवीन झळकलेल्या पोस्टरमध्ये हृता हार घातलेल्या बिग बेनला मिठी मारताना दिसत असून बाकी कलाकारांच्या चेहऱ्यावरील हावभाव काहीतरी सांगू पाहात आहेत. आता नेमके काय प्रकरण आहे, हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळणार असले तरी या पोस्टरने मात्र सिनेरसिकांची उत्सुकता निश्चितच वाढवली आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, '' पोस्टर जरी तरुणाईला आकर्षित करणारे असले तरी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी आहे. मैत्री, प्रेम आणि स्वप्ने ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. या सगळ्यांना जोडणाऱ्या 'कन्नी'ची गोष्ट प्रेक्षकांना चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही प्रेक्षकांसाठी खास हे नवीन पोस्टर आणले आहे त्यासोबतच पतंग उडवून मकर संक्रांत साजरीही केली. खूप धमाल केली. अशीच धमाल प्रेक्षकांना चित्रपट पाहतानाही येणार आहे.''
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.