संग्रहित छायाचित्र
अभिनेता आणि दिग्दर्शक अनंत महादेवन नुकतेच विनोद खन्ना यांच्याबद्दल बोलले. ते म्हणाले, ‘‘विनोद खन्ना अमेरिकेतील ओशो आश्रमात गेले होते तरी त्यांची लोकप्रियता इतकी होती की, ‘इन्साफ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तिकीटांसाठी चित्रपटगृहांबाहेर तासनतास लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
एका मुलाखतीत अनंत महादेवन यांनी विनोद खन्नासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, ‘‘मला नेहमीच विनोद खन्नासारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करायचं होतं. जेव्हा मी नक्षलवाद्यांवर ‘रेड अलर्ट’ हा चित्रपट बनवला तेव्हा त्यात आशिष विद्यार्थी, समीर रेड्डी आणि सुनील शेट्टीसारखे स्टार्स होते. त्या चित्रपटात विनोद खन्ना यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका साकारली होती. यानिमित्ताने मलाही त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.’’
एक काळ असा होता जेव्हा विनोद खन्ना यांचे स्टारडम अमिताभ बच्चन यांच्यासाठी आव्हान बनले होते. त्या काळात विनोद खन्ना यांना चित्रपट मिळू नये, यासाठी अमिताभ यांनी प्रचंड प्रयत्न केले होते, अशी चर्चा आजही केली जाते. पण जेव्हा विनोद खन्ना चित्रपटातील करिअर सोडून अमेरिकेतील ओशो आश्रमात गेले तेव्हा सर्व काही बदलले. जेव्हा पाच वर्षांनी ते परत आले आणि १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इन्साफ’ या चित्रपटाद्वारे पुन्हा कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की लोक अप्सरा थिएटरपासून एक किलोमीटरहून जास्त अंतरावर असलेल्या मराठा मंदिरापर्यंत तिकीट घेण्यासाठी लोक रांगेत उभे होते.
‘इन्साफ’ चित्रपटाची सुरुवात चांगली झाली होती. पण हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही. तथापि, विनोद खन्ना ही अशी व्यक्ती होती ज्यांनी प्रत्येक वेळी आणि प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सिद्ध केले, मग ते चित्रपट असो किंवा राजकारण. विनोद खन्ना खूप आनंदी आणि छान व्यक्ती होते. प्रत्येक वेळी मी भूमिकेसाठी त्यांच्याकडे गेलो की ते म्हणायचे, अनंत, तू मला ओळखतोस, माझा एक रेट आहे. मी फक्त ३५ लाख रुपये घेतो. तुम्ही एक दिवस शूट करा किंवा २० दिवस, माझी फी सारखीच आहे, अशी आठवण महादेवन यांनी सांगितली.