'मी लग्न तिरुपतीलाच करेन'
अभिनेता प्रभास हा सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटात तो श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. तर, अभिनेत्री क्रिती सेनॉन या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाबरोबरच प्रभास क्रिती सेनॉन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर त्यांनी कधीही कोणतेही भाष्य केलेले नाही. परंतु, आता तो लग्न कधी करणार आहे? या प्रश्नाचे त्याने उत्तर दिले आहे.
‘आदिपुरुष’चा फायनल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलर लॉन्चसाठी तिरुपतीमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी प्रभास अगदी आनंदी मूडमध्ये होता. चाहत्यांनी त्याला भरपूर प्रश्न विचारले. एका चाहत्याने त्याला “तू लग्न कधी करणार?” असा प्रश्न विचारला. यावर प्रभासनेही मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, “मी लग्न कधी करणार हे माहीत नाही, पण मी लग्न नक्कीच तिरूपतीला करणार.” प्रभासने दिलेले हे उत्तर त्याच्या चाहत्यांना फार आवडले. त्यामुळे आता प्रभास कधी लग्न करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ‘आदिपुरुष’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.