'...तिथे माझी चूकच झाली'

मागच्या काही दिवसांत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी मुघल, मराठी भाषा, पाकिस्तानमधील सिंधी भाषेबद्दल बरीच वक्तव्ये केली. त्यापैकी मराठी व फारसी भाषेचा संबंध आणि पाकिस्तानमधील सिंधी भाषेबद्दल केलेल्या विधानावरून वाद झाला. या वादानंतर नसीरुद्दीन शाह यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. हा वाद अनावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 9 Jun 2023
  • 09:08 am
 '...तिथे माझी चूकच झाली'

'...तिथे माझी चूकच झाली'

मागच्या काही दिवसांत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी मुघल, मराठी भाषा, पाकिस्तानमधील सिंधी भाषेबद्दल बरीच वक्तव्ये केली. त्यापैकी मराठी व फारसी भाषेचा संबंध आणि पाकिस्तानमधील सिंधी भाषेबद्दल केलेल्या विधानावरून वाद झाला. या वादानंतर नसीरुद्दीन शाह यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. हा वाद अनावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नसीरुद्दीन म्हणाले की, “मी नुकत्याच बोललेल्या दोन गोष्टींबाबत पूर्णपणे अनावश्यक वाद होताना दिसत आहेत. पहिला, पाकिस्तानमधील सिंधी भाषेबद्दलच्या माझ्या चुकीच्या विधानावरून झाला. तिथे माझी चूक झाली. तर, दुसरा मराठी आणि फारसी यांच्यातील संबंधांबद्दल मी जे बोललो, त्यावरून वाद झाला. ‘बरेच मराठी शब्द मूळचे  फारसी आहेत’ असे मी म्हटले होते. माझा उद्देश मराठी भाषेला कमी लेखण्याचा नव्हता, तर विविधता सर्व संस्कृतींना कशी समृद्ध करते याबद्दल बोलण्याचा होता. उर्दू ही हिंदी, फारसी, तुर्की आणि अरबी भाषांचे मिश्रण असलेली भाषा आहे. इंग्रजीने हिंदुस्तानीचा उल्लेख न करण्यासाठी सर्व युरोपियन भाषांमधून शब्द घेतले आहेत आणि पृथ्वीवर बोलल्या जाणार्‍या प्रत्येक भाषेबद्दल ते खरं आहे, असे मला वाटते.”

“बऱ्याच मराठी भाषिकांना हे माहीत नाही की, मराठीतही बरेच फारसी शब्द आहेत, ज्यांचा सर्रास वापर केला जातो. ‘आरसा’ हा फारसी शब्द आहे. ‘जकातनाका’मधील ‘जकात’ हा फारसी शब्द आहे. ‘फकत’मधून फक्त तयार झाला. असे अनेक शब्द आज मराठीचा भाग बनले आहेत, पण त्यांचे मूळ फारसी भाषेत आहे. त्या काळात फारसी भाषा सामान्य लोकसुद्धा बोलायचे. इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनाही फारसी भाषा अवगत होती,” असे नसीरुद्दीन शाह त्यांच्या मुलाखतीत म्हणाले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत नसीरुद्दीन शाह म्हणाले होते की, “मोगल हा इंग्रजी शब्द, अमेरिकन शब्द बनला आहे. सर्व मुस्लिमांना एका रंगात रंगवण्याचा आणि मुघलांचा दर्जा खाली आणणे हे सध्याच्या सरकारसाठी खूप सोयीचे आहे. त्यांनी देश लुटला, त्यांनी मंदिरे उद्ध्वस्त केली, त्यांनी हे केले आणि ते केले. त्यांना अनेक बायका होत्या, असे अनेक दावे केले जातात.”

शाह यांनी अलेक्झांडरचे उदाहरण दिले. ते म्हणाले की “त्याने संपूर्ण इराणचा नाश केला, परंतु तरीही तो महान होता, असे म्हटले जाते. मुघलांचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे आहे. मुघल भारताला आपली मातृभूमी बनवण्यासाठी आले होते, ते इथे लुटायला आले नव्हते. नादिरशहाने मोराचे सिंहासन चोरले. त्याने दिल्ली उद्ध्वस्त केली आणि दिल्लीतील नागरिकांची कत्तल केली, त्यांना लुटले हे लोकांना माहीत नाही.”

बाबर आणि हुमायूनच्या रानटीपणाच्या कथांवरही त्यांनी भाष्य केले. “हुमायून हा अफूचा व्यसनी होता, तो एके दिवशी पायरीवरून खाली पडला. अकबराने अमूक केले, असे म्हटले जाते. खरे तर, औरंगजेब या सर्वांमध्ये सर्वात मोठा खलनायक होता, पण मुघलांबद्दल बोलणारे पूर्वी इथे असलेल्या इतर घराण्यांबद्दल बोलत नाहीत. मुघल राजघराण्याआधीही इथे तुर्कांची अनेक घराणी होती,” असे ते म्हणाले होते.

शालेय अभ्यासक्रम बदलणार आहेत, त्यावरूनही शाह यांनी टीका केली. “उत्क्रांतीचा सिद्धांत पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकला आहे. मला तर वाटतं की आइन्स्टाइनची विज्ञानाची पाठ्यपुस्तकंही काढून टाकली जातील. मग सर्व वैज्ञानिक शोध वेदांमध्ये आहेत, पाश्चिमात्य देश या सर्व शोधांचं श्रेय घेत आहेत, असे इस्रोचे प्रमुख म्हणताना दिसतील”, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story