'माझ्या मुलांनी माझे चित्रपट पाहावे हे पसंद नाही'
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर त्याच्या अभिनय क्षमतेबद्दल ओळखला जातो. मोजके पण प्रभावी चित्रपटांची निवड ही त्याची खासियत म्हणावी लागेल. तो आणि त्याची पत्नी मीरा कपूर बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. शाहिद आणि मीरा कायम चर्चेत असतात. अभिनय आणि करिअरबरोबर शाहिद नेहमी कुटुंबाला प्राधान्य देतो. शाहिदने नुकतेच त्याच्या मुलांबद्दल एक खुलासा केला आहे.
शाहिद सध्या ब्लडी डॅडी या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्याला त्याच्या मुलांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “तुझी मुले तुझे चित्रपट पाहतात का, त्यांनी कधीतरी तुला चित्रपट कसे वाटतात याबद्दल सांगितले आहे का,” असा प्रश्न त्याला विचारला. त्यावेळी शाहिदने फारच छान पद्धतीने उत्तर दिले. तो म्हणतो की, माझ्या मुलांनी माझे चित्रपट पाहावेत, हे मला फारसं आवडत नाही. त्यांनी मला एकदा विचारले की, तुम्हाला अनेक लोक पाहायला का येतात? पण माझ्या मुलांनी अद्याप माझे चित्रपट पाहिलेले नाहीत.
शाहिद म्हणतो की, काही दिवसांपूर्वी त्यांनी माझा ‘जब वी मेट’ हा चित्रपट पाहिला. माझ्या आईने त्यांना तो चित्रपट दाखवला आणि माझी पत्नी मीरालाही त्यांनी तो चित्रपट पाहावा, असे वाटतं होते. कारण या चित्रपटात मी कोणालाही मारहाण केलेली नाही आणि कोणतेही आक्षेपार्ह काम केलेले नाही. हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याने तो मुलांनी पाहावा असे मीराला वाटत होते. माझ्या मते तरी त्यांनी ‘जब वी मेट’ हाच पहिला चित्रपट पाहिला असेल.
दरम्यान शाहिद आणि मीराचे लग्न ७ जुलै २०१५ मध्ये झाले होते. लग्नाच्या वेळी मीरा फक्त २१ वर्षांची होती. त्या दोघांच्या वयात १३ वर्षांचे अंतर आहे. लग्नानंतर वर्षभरातच मीराने मुलीला जन्म दिला. तिचं नाव मिशा आहे. त्यानंतर २०१८ मध्ये तिने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव झैन असे आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.