'पहिल्या कमाईतून आईसाठी आईस्क्रीम घेतले होते'
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते म्हणजे समीर चौघुले. अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी मराठी कलाविश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. समीर चौघुलेंचा चाहता वर्ग मोठा असून, सोशल मीडियावरही ते प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आगामी प्रोजेक्टबद्दल अनेकदा ते पोस्ट शेअर करत माहिती देतात.
कल्पक विनोदबुद्धी व अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसवणारे चौघुले अभिनय क्षेत्रात येण्याआधी बँकेत नोकरी करत होते. चौघुलेंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. “तुम्ही स्वत:च्या कमाईतून कोणती पहिली गोष्ट खरेदी केली होती,” असा प्रश्न चौघुलेंना विचारण्यात आला.
चौघुले या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाले, “आई-वडिलांसाठी मी आईस्क्रीम घेतलं होतं. माझ्या आईला आईस्क्रीम खूप आवडते, तेव्हा मी बँकेत नोकरीला लागलो होतो. त्यावेळी मला महिन्याला ३३७ रुपये पगार होता. पहिल्या पगारातून मी आईसाठी आईस्क्रीम घेतले होते.”
चौघुले यांनी अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. मराठी चित्रपटांतूनही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘जग्गू आणि ज्युलिएट’, ‘बांबू, ‘हवाहवाई’, ‘चंद्रमुखी अशा चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.