हॅपी बर्थ डे सोनाक्षी!
बॉलिवूडची सौंदर्यवती सोनाक्षी सिन्हाने शुक्रवारी वयाची ३६ वर्षे पूर्ण केली असून या निमित्ताने तिचे वडील आणि शॉटगन अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी तिच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. खास तिच्यासाठी त्यांनी एक भावनापूर्ण पत्रही लिहिले आहे. सोनाक्षीने याच वर्षी दहाड या वेबसीरिजद्वारे ओटीटी विश्वात पाऊल ठेवले असून वेबसीरिजमधील तिच्या अभिनयाचे त्यांनी कौतुक केले आहे.
शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की, या खास दिवसानिमित्त लाडक्या लेकीला खूप खूप शुभेच्छा. येणारे वर्ष तुला आनंदाचे , यशाचे, भरभराटीचे जावो. आम्हा सर्वांना तुझा आणि तुझ्या यशाचा अभिमान आहे. विशेषत: दहाडमधील तुझे काम अप्रतिम आहे. तू माझ्यासाठी नेहमीच खास राहशील.
अलीकडेच सोनाक्षी एका मुलाखतीत म्हणाली होती की, या वर्षी वाढदिवसानिमित्त कोठेही फिरायला जाणार नाही. गेली ५-६ वर्षे वाढदिवसाच्या दिवशी सहलीला जाते. या वर्षी मला त्यातून ब्रेक घ्यायचा आहे. या वर्षी वाढदिवस माझ्या जवळच्या मित्रांसोबत साजरा करणार आहे.
गेल्या महिन्यात सोनाक्षी सिन्हाने 'दहाड' या वेबसीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण केले. या वेबसीरिजचे एकूण आठ भाग प्रदर्शित झाले आहेत. एका छोट्याशा शहरातील महिला पोलीस अधिकारी अंजली भाटीच्या अवतीभोवती याची कथा आहे. सार्वजनिक शौचालयात एकामागून एक होणाऱ्या खुनांचा तपास अंजली भाटी करत असताना सीरियल किलर मात्र बिनधास्त फिरत असल्याचे तिच्या लक्षात येते. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या या घटना सीरियल किलरच्या शिकार झाल्याचे समजताच अंजली याचा छडा कसा लावते, हे दाखविण्यात आले आहे. आता सोनाक्षी लवकरच ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफही दिसणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.