आदिवासींच्या भावना दुखावल्याने चौघुलेंची माफी
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर परदेशातही चाहते आहेत. यातील कलाकारांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले आहे. यातीलच आघाडीचा कलाकारम्हणजे समीर चौघुले. समीर यांच्या विनोदबुद्धीचे, त्यांच्या टायमिंगचे नेहमीच कौतुक होताना दिसते. सध्या समीर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. एका स्किटमध्ये सादर केलेल्या तारपा नृत्यामुळे त्यांना माफी मागावी लागली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या एका भागात समीर यांनी तारपा नृत्य सादर केले होते. त्या स्किटमधील ३० सेकंदांची समीर यांची एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. या व्हायरल क्लिपमध्ये ते तारपा नृत्य सादर करताना दिसत आहेत. मात्र, हे नृत्य सादर केल्यानंतर आदिवासी समाजाची खिल्ली उडवली जात आहे अशी टीका समीर यांच्यावर करण्यात आली. याचबाबत त्यांनी आता माफी मागितली आहे.
आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने समीर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये माफी मागितली. ते म्हणाले, “मी सादर केलेल्या एका स्किटमधील ३० सेकंदाची क्लिप सध्या खूप व्हायरल झाली आहे. त्या स्किटमध्ये मी तारपा नृत्य करत आहे. तारपा नृत्य मी सादर केले, पण त्यानंतर लक्षात आले की, यामुळे माझ्या आदिवासी बंधू व भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सर्वप्रथम मी झालेल्या प्रकाराबाबत माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. हा प्रकार पुन्हा होणार नाही याची तुम्हाला ग्वाही देतो. हा प्रकार अनावधानाने झाला होता. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू कधीच नसतो. हा हेतू भविष्यातही नसेल.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.