बिग बी म्हणतात, तू चीज बडी है मस्क मस्क!
बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या ट्विटर अकाऊंटवरील विश्वासार्हतेची ‘ब्ल्यू टिक’ हटविण्यात आल्यानंतर मोठा गहजब उडाला होता. अमिताभ यांनी ट्विटरच्या नव्या नियमानुसार पैसे भरूनही त्यांना ‘ब्ल्यू टिक’ नव्याने बहाल करण्यात न आल्याने त्यांनी या कंपनीचे मालक एलन मस्क यांना उद्देशून एक ट्विट केले होते. ते मजेशीर ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्याची दखल घेत ट्विटर कंपनीने अमिताभ यांना ‘ब्ल्यू टिक’ बहाल केली. ही ‘ब्ल्यू टिक’ मिळाल्यानंतर आनंदित झालेल्या अमिताभ यांनी ‘तू चीज बडी है मस्क मस्क’ असे मिश्किल ट्विट करत मस्क यांचे आभार मानले.
ट्विटरने २० एप्रिलच्या मध्यरात्री आपल्या प्लॅटफॉर्मवरून व्हेरिफाइड यूजर्सची ‘ब्ल्यू टिक’ हटवली होती. ‘ब्ल्यू टिक’ सब सस्क्रिप्शन घेणाऱ्या यूजर्सनाच यापुढे ही सुविधा असणार आहे. पैसे भरल्यावर आता अमिताभ यांच्या ट्विटर अकाउंटवर ‘ ब्ल्यू टिक’ परत आली आहे. यावर त्यांनी एकामागोमाग तीन ट्वीट केले आहेत. अमिताभ यांचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहेत.
अमिताभ यांनी पहिल्या ट्वीटमध्ये मस्क यांना उद्देशून चक्क गाणे म्हटले. अलाहाबादी टोनमधील हिंदीत ते म्हणतात, ‘‘मस्क भैया… मी तुला खूप खूप धन्यवाद देत आहे. तू माझ्या नावाच्या पुढे ब्ल्यू टिक लावली आहेस. आता तुला काय सांगू? एक गाणं गुणगुणावसं वाटत आहे. ऐकतोय ना? तू चीज बडी है मस्क मस्क… तू चीज बडी है मस्क मस्क…’’ त्यानंतर अमिताभ यांनी दुसरे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ट्विटरला चक्क मावशी असे संबोधले आहे. तिसऱ्या ट्विटमध्ये अमिताभ यांनी ट्विटरचा मावशी म्हणून का उल्लेख केला, याचे स्पष्टीकरणही दिले आहे. ट्विटरने ‘ब्ल्यू टिक’ काढून टाकल्यानंतर बिग बींनी मजेशीर अंदाजात ट्वीट करत ट्विटरकडे ती परत करण्याची विनंती केली होती. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, ‘‘ट्विटरदादा... आम्ही आता पैसेपण दिले आहेत, तर आता ते जे निळं कमळ लावतात स्वतःच्या नावापुढे ते पुन्हा लावून द्या की, म्हणजे निदान लोकांना कळू दे की मीच अमिताभ बच्चन आहे, हात तर जोडलेत आता काय पाया पडू का?’’