भरत जाधव : तर रत्नागिरीत पाऊल ठेवणार नाही
‘‘नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही,’’ असे जाहीरपणे म्हणत अभिनेता भरत जाधव याने नाट्यगृहाच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. "तू तू मी मी" या नाटकाचा शनिवारी रत्नागिरीमध्ये प्रयोग होता. यावेळी नाट्यगृहातील एसी आणि साऊंड सिस्टिमवरून भरत जाधव संतापले.
‘‘नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही. मेकअप रूम, व्यासपीठ आणि प्रेक्षक बसतात त्या ठिकाणी एसी नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पाहा,’’अशी विनंतीही त्यांनी प्रेक्षकांना केली. नाट्यगृहाची अशी परिस्थिती असताना प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकतात? रत्नागिरीत पुन्हा शो होणार नाही, असेही त्यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केले.
शनिवारी रात्री १० वाजता रत्नागिरीमधील नाट्यगृहात 'तू तू मी मी' नाटकाचा प्रयोग होता. प्रचंड उकाड्यात हा प्रयोग सुरू झाला. नाट्यगृहातील एसी बंद, फॅन नाहीत आणि नाट्यगृहाची स्वतःची अशी साऊंड सिस्टिम नसल्याने कलाकारांना नाराज होऊन परतावे लागले.
यापूर्वी प्रसिद्ध नाट्य अभिनेता प्रशांत दामले याने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत याबाबत नाराजी व्यक्त केली होती. ‘‘हुतात्मा स्मृती मंदिरात एसी आहे पण त्याची थंड हवाच येत नाही. त्यामुळे आत बसल्यावर सारखं गुदमरल्यासारखं वाटतं,’’ अशी व्यथा त्याने मांडली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.