हशा आणि टाळ्यांच्या गजरात दुमदुमली बालनगरी
पिंपरी - चिंचवड : 'ढब्बू गोल रिमोट गोल' हे दोन अंकी बाल नाट्य, सूर्य पृथ्वीवर रागवला तर काय होईल, या संकल्पनेवर आधारीत पपेट शो, बाल कथा अन् धमाल बाल गीतांच्या सादरीकरणाने बालनगरी हशा आणि टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेली. सुट्टीचा दिवस असल्याने या सर्व कार्यक्रमांना लहान बालमित्रांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात यंदा पहिल्यांदाच बालकांसाठी बालनगरी स्वतंत्रपणे उभारण्यात आली. लहान मुलं व पालक वर्गांकडून या बालरंगभूमीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. आज नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी बालनगरी, सुधा करमरकर रंगमंच येथे अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी -चिंचवड शाखा सहकार्यवाह गौरी लोंढे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रंगदेवतेची पूजा करण्यात आली. यावेळी १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अखिल भारतीय नाट्य परिषद शिरूर शाखेचे अध्यक्ष दीपाली शेळके, रुपाली पाथरे आदि मान्यवर उपस्थित होते.
सकाळी कार्यक्रमाची सुरूवात नृत्यकला अकादमीच्या वतीने गणेश वंदना सादर करून करण्यात आली. त्यानंतर नाट्य संस्कार कला अकादमी, पुणेच्या वतीने 'ढब्बू गोल रिमोट गोल' हे दोन अंकी बाल नाट्य सादर करण्यात आले. बालचमुनी हश्या आणि टाळ्यांच्या गजरात या नाटकाला प्रतिसाद दिला. नंतर रंगलेल्या 'पपेट शो - कुकुडूकू' याने तर सर्वच बालकांची मने जिंकली. सूर्य पृथ्वीवर रागवला तर काय होईल, या संकल्पनेवर आधारीत हा कार्यक्रम पपेटरी हाऊस मुंबई यांनी सादर केला. यानंतर नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या वतीने 'माझी माय' हे बाल नाट्य सादर केले. तसेच बाल कथांचा गोष्ट रंग हा कार्यक्रम रंगला. रेनबो अंब्रेला पुणे प्रस्तूत 'गोष्ट सिम्पल पिल्लाची, ग्रीप्स थिएटर' हे नाटक सादर केले. तर संध्याकाळच्या वेळी धमाल बालगीतं सादर करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.