संग्रहित छायाचित्र
अर्जुन कपूरने अलीकडेच त्याच्या 'इशकजादे' या डेब्यू चित्रपटाशी संबंधित एक मजेदार प्रसंग शेअर केला आहे. या चित्रपटात अभिनेत्यासोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसली होती. मात्र, अर्जुन तिच्या कास्टिंगवर खूश नव्हता. ‘‘परिणीती मला बोलकी मुलगी वाटत होती. सततच्या बोलण्यामुळे ती इरिटेड करायची. त्यामुळे तिला कास्ट करावे असे मला वाटत नव्हते,’’ असे त्याने सांगितले.
जेव्हा परिणीतीला चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले तेव्हा मला अजिबात आनंद झाला नव्हता. मी तिच्या कास्टिंगच्या विरोधात होतो कारण ती खूप बोलते आणि तिचे संवादवाचनदेखील खराब होते. परिणीती येताच मी एक गंमत सांगितली. पण त्यावर हसण्याऐवजी परिणिती जेन-झेड लोकांप्रमाणे म्हणाली - LOL, मला आश्चर्य वाटले की ती यावर हसू शकत नाही का? परिणीती चॅटवर इमोजीमध्ये बोलायची, मेसेज करताना खूप इमोजी वापरायची. त्यामुळे ती गंभीर नाही, असे मला वाटू लागले होते, अशी आठवदेखील अर्जुनने सांगितली.
अर्जुन गमतीने म्हणाला, ‘‘माझ्या चित्रपटातील झोयाला (इशकजादेमधील परिणीतीच्या पात्राचे नाव) भेटण्यासाठी मी सहा महिने वाट पाहत होतो, पण झोया सेटवर आली आणि LOL-LOL म्हणत होती. मला वाटलं माझं करिअर संपलं. या मुलीला चित्रपटात रस नाही. मात्र जेव्हा जेव्हा मॉक शूट झाला तेव्हा मला धक्का बसला. परिणीतीचे कौशल्य पाहून मी कित्येक महिने लक्षात ठेवलेल्या ओळी आणि अभिनय विसरलो होतो. शूट सुरू झाल्यावर मला परिणीतीच्या डोळ्यात चमक दिसली. मग मला वाटले की ती करेल... आणि तिने खरंच चांगलं काम केलं.’’
अर्जुन हा रोहित शेट्टीच्या सुपरहिट कॉप युनिव्हर्स चित्रपट 'सिंघम अगेन' मध्ये शेवटचा दिसला होता. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली. त्याचबरोबर या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि टायगर श्रॉफदेखील मुख्य भूमिकेत दिसले होते.